सोन्याची आयात कमी करण्यात भारताला यश

नवी दिल्ली – सरलेल्या 2018-19 या आर्थिक वर्षात भारताने केलेल्या सोन्याच्या आयातीत तीन टक्‍क्‍यांची घट होऊन की 32.8 अब्ज डॉलर एवढी झाली आहे. यामुळे चालू खात्यावरील तूट आटोक्‍यात ठेवण्यास सरकारला मदत मिळणार आहे.2017-18 या आर्थिक वर्षात भारताने 33.7 अब्ज डॉलरच्या सोन्याची आयात केली होती. वाणिज्य मंत्रालयाने जारी केलेल्या या आकडेवारीनुसार केंद्र सरकारने बऱ्याच उपाययोजना केल्यामुळे सोन्याची आयात कमी ठेवण्यात यश मिळाले आहे.

सोन्यावरील आयात शुल्क वाढविण्यात आले आहे. त्याचबरोबर आयात केलेल्या सोन्याचा काय उपयोग केला जातो याकडे देखरेख ठेवली जात आहे. सोन्याची तस्करी होणार नाही यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र व्यापाऱ्यांनी सांगितले की सरलेल्या वर्षात जागतिक बाजारात सोन्याचे दर तुलनेने कमी होते. त्यामुळे सोन्याची आयात मूल्यात कमी झाल्यासारखे भासत आहे.

फेब्रुवारीपर्यंत आयात कमी झाली होती. मात्र, मार्चमध्ये आयात वाढून 3.27 अब्ज डॉलर झाली. भारतात सोन्याचे आणि सोन्याच्या दागिन्यांचे बरेच आकर्षण आहे. मात्र, भारतात सोन्याचे उत्पादन फारसे होत नाही. त्यामुळे सोन्याची बहुतांशी गरज आयातीच्या माध्यमातून भागविली जाते. ही निरुपयोगी आयात वाढल्यामुळे भारताच्या चालू खात्यावरील तूट वाढत आलेली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.