यश हा दक्षिणेतला सुपरस्टार. कन्नड चित्रपटांत त्याने काम केले असले तरी त्याच्या केजीएफमुळे तो प्रचंड लोकप्रिय झाला आहे. बॉलीवूडचे प्रेक्षक अथवा हिंदी बेल्टमध्ये असणारे प्रेक्षकही त्याचे फॅन आहेत. त्याची दाढी आणि दबंग लुक यामुळे तो अनेकांना आयडॉल वाटतो. अन्य चित्रपटांप्रमाणे कन्नड चित्रपट सृष्टीलाही करोनाचा फटका बसला आहे.
2020 पासून सुरू झालेला करोनाचा प्रकोप अद्याप शांत झालेला नाही. 2020 च्या अखेरीस काही निर्बंध उठवण्यात आले होते. मात्र, पुन्हा दुसरी लाट आली व जे काही थोडेबहुत काम सुरू होते ते पुन्हा बंद करावे लागले. आताही टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन उठवण्याचे काम सुरू आहे. मात्र, त्यातून पूर्ण जोमात काम सुरू होण्यास काही कालावधी जाणार आहे.
मोठ्या कलाकारांचे आणि निर्मात्यांचे ठीक; पण करोनाने छोटे आर्टिस्ट, कामगार आणि तंत्रज्ञ यांचे कंबरडे मोडले आहे. या लोकांचे पोट हातावर असते. काम असेल तर पैसे मिळतात; अन्यथा घरी बसून घर चालवता येत नाही. हे चित्र डोळ्यांसमोर दिसल्याने यशनेही आता पुढाकार घेतला आहे. तो 3000 कामगारांना रोख मदत करणार आहे.
या वर्कर्सच्या बॅंक खात्यात तो प्रत्येकी 5 हजार रुपये जमा करणार आहे. कलाकारांच्या युनियनचे अध्यक्ष आणि जनरल सेक्रेटरी यांना त्याने आपला इरादा बोलून दाखवला. आता सर्व कर्मचाऱ्यांचे बॅंक खाते नंबर व अन्य माहिती मिळाल्यावर पैसे जमा करण्याचे काम सुरू होणार असल्याची माहिती त्याने स्वत: ट्विटरवर दिली आहे. हे काही फार मोठे काम नाही. मात्र, आताच्या कठीण काळात या लोकांना यामुळे थोडी मदत होईल असे यशचे म्हणणे आहे.