मुंबई: भारतीय हवामान विभागानं मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याची माहिती दिली आहे. केरळच्या दक्षिण भागात मान्सून सक्रिय झाला आहे.
नैऋत्य मोसमी पाऊस म्हणजेच मान्सून केरळमध्ये दोन दिवस उशिरा दाखल झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. यंदाचा मान्सून पाऊस सरासरीच्या सामान्य राहिल, असा अंदाज हवामान विभागाने यापूर्वीचं वर्तवला आहे.
भारतीय हवामान विभागाचे कार्यकारी संचालक मृत्यूंजय मोहापात्रा यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार केरळच्या दक्षिण भागात मान्सून धडकला आहे.
मान्सून केरळ मध्ये आज दाखल…
IMD https://t.co/XaoSVCpjUh— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 3, 2021
भारतीय हवामान विभागनं यापूर्वी मान्सून केरळमध्ये 1 जूनला दाखल होईल, असं म्हटलं होते. मात्र, त्यानंतर 31 मे रोजी मान्सून दाखल होईल, असं सांगण्यात आलं. भारतीय हवामान विभागानं पुन्हा नवीन माहिती देत 3 जूनला मान्सून दाखल होईल, असं सांगितलं होतं. त्याप्रमाणं मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे.
दरवर्षी साधारणपणे मान्सून 1 जूनला दाखल होतो, यंदा दोन दिवसं उशिरानं केरळमध्ये दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागानं मान्सून दक्षिण अरबी समूद्र, लक्षद्वीप, दक्षिण केरळ, दक्षिण तामिळनाडू, कोमोरिन मालदिव भागात सक्रिय झाल्याचं सांगितलं आहे.
भारतीय हवामान विभाग म्हणजेच आयएमडीने यंदाचा मान्सून सरासरीच्या 101 टक्के असेल असा अंदाज वर्तवला आहे. यानुसार यंदा मान्सून सामान्य राहणार आहे. यंदा पाऊस सरासरीच्या 100 टक्के पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. भारतात जून ते सप्टेंबर या काळामध्ये मान्सून सरासरीच्या सामान्य राहणार आहे. 96 टक्के ते 104 टक्क्यांपर्यंतच्या पावसाला सामान्य मान्सून म्हटलं जातं
मान्सूनचा पाऊस उत्तर पश्चिम भारतात 92-108 टक्के होण्याती शक्यता आहे. तर, दख्खनच्या पठारावर 93-107 टक्के पाऊस होऊ शकतो. उत्तर पूर्व भारतात 95 टक्के तर मध्य भारतात 106 टक्के पेक्षा कमी पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.