कोपरगाव – सहकारी तत्वावरील दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील आर्थिक विकासाला चालना मिळालेली असून भविष्यात या व्यवसायाला अधिक गती मिळण्यासाठी व जातीवंत गाईंची संख्या वाढविण्यासाठी शासनाने राज्यातील सहकारी दूध संघांना सॉर्टडसिमेनसाठी अनुदान उपलब्ध करुन द्यावे अशी मागणी गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांनी केली.
गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाची 48 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संघाच्या कार्यस्थळावर झाली.यावेळी अध्यक्षपदावरुन परजणे पाटील बोलत होते. संघाचे कार्यकारी संचालक चंद्रकांत गाढवे यांनी मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन केले. विषयपत्रिकेवरील सर्व विषय सविस्तर चर्चेने सर्वानुमते मंजूर करण्यात आलेत.
परजणे म्हणाले की, उरळीकांचन येथील भारतीय कृषी उद्योग प्रतिष्ठानच्या सहकार्याने गोदावरी दूध संघाने कार्यक्षेत्रामध्ये 41 केंद्रांमार्फत कृत्रिमरेतन गर्भधारणा उपक्रम राबवून मोठ्या प्रमाणावर जातीवंत गाईंची पैदास केली. याशिवाय संघाने भारतात सर्वप्रथम गोदावरीच्या कार्यक्षेत्रात सॉर्टेडसिमेनसारखा उपक्रम राबवून 30 ते 35 लिटर दूध देणाऱ्या गाईंची पैदास करुन दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक समृध्दी निर्माण करुन दिली. हा कार्यक्रम राबविताना सॉर्टेडसिमेनचा दर प्रत्यक्षात 1 हजार 50 रुपये असताना दूध उत्पादकांकडून केवळ चारशे रुपये एवढे नाममात्र शुल्क संघ आकारतो. यासाठी संघ दरमहा सव्वा दहा लाखाहून अधिक रुपये खर्च करीत आहे.
संघाने गांव पातळीवरील प्राथमिक सहकारी दूध संस्था व सेंटरच्या दूध उत्पादकांना गायी खरेदीकरिता प्रवरा सहकारी बॅंक, स्टेट बॅंक ऑफ इंडिया या बॅंकांमार्फत सुमारे 4 हजार शेतकऱ्यांना 45 कोटी रुपयाचे कर्ज अनुदान रुपाने उपलब्ध करून दिलेले आहे. दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यातील दूध उत्पादकांच्या अडचणी विचारात घेऊन दुधाला दर वाढवून देण्याच्या उद्देशाने समिती गठीत करुन 34 रुपये दर देण्याचे निश्चित केले आहे, असे ते म्हणाले.
राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड (आनंद) यांच्या संयुक्त सहकार्याने संघ परिसरातील दूध उत्पादकांना बायोगॅस (गोबरगॅस) संयंत्र अनुदान तत्वावर उपलब्ध करून देत आहोत. हे बायोगॅस संयंत्र संघ परिसरामध्ये सुमारे पाच हजार कुटुंबांना देण्यात येणार आहे. त्यादृष्टीने या उपक्रमाची सुरुवात देखील करण्यात आलेली आहे. यावेळी संघाचे संचालक विवेक परजणे, उत्तमराव डांगे, भाऊसाहेब कदम, गोरक्षनाथ शिंदे, नानासाहेब काळवाघे, सुदामराव कोळसे, जगदीप रोहमारे, संजय टुपके, भिकाजी झिंजुर्डे, दिलीप तिरमखे, सुनंदाताई होन, सरलाताई चांदर, सुमनबाई शिंदे आदी उपस्थित होते. उपाध्यक्ष गोपीनाथ केदार यांनी आभार मानले.