कोल्हापूर – जिल्ह्यातील प्रत्येक तालुकास्तरावर एचआयव्ही संसर्गित रुग्णांना एआरटी औषध पुरवठा होण्यासाठी, लिंक्ड एआरटी केंद्र व ग्रामीण भागातील रुग्णांना अत्यावश्यक वेळी रक्ताची कमतरता भासू नये, याकरिता प्रत्येक तालुक्यात रक्त संकलन व साठवण केंद्र सुरु करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे तात्काळ प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या. प्राथमिक आरोग्य उपकेंद्र स्तरावर एचआयव्ही तपासणी किट साठवणीसाठी शीतगृह उपलब्ध करुन देण्याबाबतही त्यांनी सांगितले.
जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीच्या आढावा बैठकीदरम्यान ते बोलत होते. यावेळी एचआयव्ही – क्षयरोगबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रल्हाद देवकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उषादेवी कुंभार, जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीक्षक डॉ.बर्गे प्रमुख उपस्थित होते.