प्रा. विद्यासागर वाघिरे ः हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात मराठी भाषा दिन उत्साहात
राजगुरुनगर -विद्यार्थ्यांचे अभ्यासक्षेत्र कोणतेही असले तरी सकारात्मकता, कल्पनाशक्ती, सर्जनशीलता आणि मानवी मूल्ये समृद्धपणे अनुभवण्यासाठी पुस्तकांशी मैत्री करण्याचे आवाहन कवी व पिंपरीच्या महात्मा फुले महाविद्यालयातील प्रा. विद्यासागर वाघिरे यांनी केले.
येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात मराठी विभाग व मराठी वाङ्मय मंडळ यांच्या वतीने जागतिक मराठी राजभाषा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. याप्रसंगी प्राचार्य डॉ. एच. एम. जरे, कला शाखेचे उपप्राचार्य डॉ. संजय शिंदे, प्रा. किशोर लांडेपाटील, प्रा. दिलीप मुळूक, डॉ. बाळासाहेब अनुसे, प्रा. मच्छिंद्र मुळूक, प्रा. शंकर गोपाळे उपस्थित होते. मराठी भाषेचा गौरव करताना प्रा. वाघिरे म्हणाले की, मराठी भाषेची परंपरा प्राचीन असून गाथासप्तपदी ग्रंथ, ताम्रपट, शिलालेखापासून तिचा प्रवास सुरू झाल्याचे सांगता येते. ज्ञानेश्वरी आणि गाथा महाराष्ट्राचा सांस्कृतिक ऐवज असून प्रत्येकाने एक तरी ओवी अनुभवायला हवी.
प्रास्ताविकात बोलताना उपप्राचार्य डॉ. संजय शिंदे यांनी मराठी भाषा फक्त अभिमानासाठी न राहता ज्ञानभाषा होण्यासाठी सरकार दरबारी प्रयत्न व्हायला हवेत, असे सांगितले. मराठी विभागाच्या वतीने कुसुमाग्रज यांच्या कवितांचा जागर करण्यात आला. या उपक्रमात सिद्यार्थ सावंत, प्रतीक्षा मोरे, शीतल रौंधळ, प्रज्ञा तळेकर, आरती ताटके या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. याप्रसंगी कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य डॉ. एच. एम. जरे, उपप्राचार्य प्रा. एस. एन. टाकळकर यांनी केले. सूत्रसंचालन मराठी वाङ्मय मंडळ प्रमुख डॉ. बाळासाहेब अनुसे यांनी तर प्रा. किशोर लांडेपाटील यांनी आभार मानले.