वेतनश्रेणीसाठी घेतली होती 14 हजारांची लाच; शिक्षण क्षेत्रात खळबळ
सातारा – सातारा पालिकेच्या शाळांमधील सात शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा फरक देण्यासाठी 14 हजार रुपयांची लाच घेणारा पालिका शिक्षण मंडळाचा मुख्य लिपिक आनंदराव गोविंदराव नवाळे याला चार वर्षे सक्तमजुरी, पाच हजार रुपये दंड आणि दंड न दिल्यास तीन महिने सक्तमजुरी, अशी शिक्षा विशेष न्यायाधीश एन. एल. मोरे यांनी सुनावली. त्यामुळे पालिका शिक्षण मंडळात खळबळ उडाली आहे.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती अशी, नवाळे हा सातारा पालिकेच्या शिक्षण मंडळात मुख्य लिपिक आहे. पालिकेच्या शाळांमधील सात शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा फरक काढून देण्यासाठी नवाळे याने त्यांच्याकडून प्रत्येकी दोन हजार लाच मागितली होती. त्यापैकी एका शिक्षकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दि. 26 ऑगस्ट 2014 रोजी तक्रार दिली होती.
तक्रार मिळाल्यावर या विभागाचे तत्कालीन पोलीस निरीक्षक बयाजी कुरळे यांनी तक्रारीची पडताळणी करून नवाळेला पडकडण्यासाठी त्याच दिवशी शिक्षण मंडळ कार्यालयाच्या परिसरात सापळा लावला होता. त्यावेळी नवाळेला 14 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. त्याच्याविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. बयाजी कुरळे यांनी तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. या खटल्याची सुनावणी न्यायाधीश एन. एल. मोरे यांच्यसमोर झाली. सरकारी वकिलांनी केलेला युक्तिवाद व साक्षीदारांच्या साक्षी ग्राह्य धरून न्यायाधीश मोरे यांनी नवाळेला चार वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनवाली.