हमीपत्र भरून देण्यास पालकांचा आखडता हात

नववी, दहावी वर्ग सुरू; केवळ 16 टक्‍केच विद्यार्थी उपस्थिती

 

पुणे – शहरातील निम्म्यापेक्षा कमी शाळांना नववी आणि दहावीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे. मात्र, त्या शाळांतही केवळ 16 टक्‍के विद्यार्थीच उपस्थित राहत असल्याची माहिती उजेडात आली आहे. पालकांनी हमीपत्र भरून न दिल्याने उपस्थिती रोडावली असल्याचे चित्र आहे.

अद्यापही परिस्थिती नियंत्रणात आल्यावर पालकांचा विश्‍वास नाही. अनेक शाळांच्या मुख्याध्यापकांनी सांगितले की, ते विद्यार्थ्यांना केवळ प्रयोग आणि पूर्व परीक्षेसाठी बोलावणार अहोत. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील शाळांमध्ये सोमवारी 21.52 टक्‍के उपस्थिती होती. तर, पुणे महापालिकेच्या शाळांत केवळ 13.46 टक्‍के उपस्थिती होती. ग्रामीण भागातील शाळा 23 नोव्हेंबरला सुरू झाल्या असून त्यात सोमवारी 24.35 टक्‍के उपस्थिती असल्याचे स्पष्ट झाले.

जिल्ह्यात एकूण 1 हजार 975 शाळा आहेत. त्यातील 1 हजार 246 सुरू झाल्या आहेत. त्यातील 2 लाख 54 हजार विद्यार्थ्यांच्या पालकांनी हमीपत्र भरून दिले आहे. मात्र, या दोन वर्गातील पटसंख्या 5 लाख 65 हजार आहे. त्यातील केवळ 1 लाख 16 हजार मुलांनी शाळेत हजेरी लावली आहे.

हमीपत्रानंतरच शाळेत प्रवेश

आम्ही शाळा सुरू केली आहे. 12वीच्या विद्यार्थ्यांना आम्ही प्रयोगासाठी बोलवत आहोत. तर, दहावीच्या विद्यार्थ्यांना पूर्व परीक्षेसाठी बोलावले आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी हमीपत्र भरून देण्याचे मान्य केले आहे. त्याच विद्यार्थ्यांना प्रशालेत प्रवेश देत आहोत, असे एका शाळेच्या मुख्याध्यापकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.