पुणे महापालिका दवाखान्यांचे “फायर सेफ्टी ऑडिट’

आग प्रतिबंधक, वीज यंत्रणेची तपासणी : शहरातील तीन रुग्णालयांच्या यंत्रणेमध्ये आढळल्या त्रुटी

 

पुणे – भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या “एनआयसीयू’ला आग लागून दहा बाळांचा मृत्यू झाल्याच्या दुघटनेनंतर पुण्यातील रुग्णालयांच्या “फायर सेफ्टी ऑडिट’चा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. या दुर्घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या आरोग्य विभागाने पालिका रुग्णालय आणि दवाखान्यांचे “फायर’ आणि “इलेक्‍ट्रिकल’ ऑडिट करण्याचे पत्र अग्निशमन विभागाला दिले.

त्यानुसार, आग प्रतिबंधक यंत्रणा तपासणीचे काम हाती घेतले आहे. त्यामध्ये मंगळवार पेठेतील कमला नेहरू रुग्णालय, नेहरू रस्त्यावरील सोनवणे प्रसूतिगृह आणि येरवड्यातील राजीव गांधी रुग्णालयाच्या “फायर सेफ्टी ऑडिट’मध्ये अनेक त्रुटी आढळल्या असून, त्या तातडीने दूर करण्याच्या सूचना अग्निशमन विभागाने आरोग्य विभागाला केल्या आहेत.

भंडारा येथील दुर्घटना झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनीच राज्यातील सर्व रुग्णालयांचे ऑडिट करून घेण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार पुणे महापालिकेने महत्त्वाच्या तीन रुग्णालयांमध्ये प्राधान्याने तपासणी सुरू केली आहे. आग लागली तर धोक्‍याची सूचना देण्यासाठी प्रत्येक मजल्यावरचे “स्मोक डिटेक्‍टर’ आणि “अलार्म सिस्टीम’ बंद, “फायर एक्‍स्टिंग्विशर’चे “रिफिलिंग’ झाले नसल्याने ते वापरण्यास योग्य नाहीत, आग शमवण्यासाठी पाण्याचा पुरवठा करणारा पंप बंद, अग्निशमन यंत्रणा वापराचे ज्ञान कर्मचाऱ्यांना नाही. अशा बाबी पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालय, कै. चंदूमामा सोनवणे प्रसूतिगृह आणि स्व. राजीव गांधी रुग्णालयात आढळून आल्या.

महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालय, सोनवणे रुग्णालय आणि राजीव गांधी रुग्णालयाच्या “फायर सेफ्टी ऑडिट’चे काम पूर्ण झाले आहे. त्यातील त्रुटी आरोग्य विभागाला कळविल्या आहेत. पालिकेची उर्वरित सर्व रुग्णालये आणि दवाखान्यांचे आणि शाळांचे “फायर सेफ्टी ऑडिट’ आठवडाभरात पूर्ण करणार असून, त्याचा अहवाल आरोग्यप्रमुखांना आणि शिक्षण विभागाला सादर केला जाईल. या कामासाठी दहा अधिकाऱ्यांची नेमणूक केल्याचे महापालिकेतील मुख्यअग्निशमन अधिकारी प्रशांत रणपिसे यांनी सांगितले.

महापालिका अंदाजपत्रकात तरतूद

महापालिकेच्या रुग्णालये, प्रसूतिगृहे आणि दवाखान्यांच्या फायर आणि इलेक्‍ट्रिकल ऑडिट करण्यासाठी अंदाजपत्रकात 45 लाख रुपये तरतूद असून, त्यातून ऑडिटमध्ये आढळणाऱ्या कमतरता दूर केल्या जाणार असल्याचे महापालिकेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.