पुण्याची टेबल टेनिसपटू पृथा वर्टीकर हिने आपल्या कामगिरीला नवी झळाळी दिली आहे. नुकत्याच राज्य अजिंक्यपद स्पर्धेत तिने दोन गटात विजेतेपद मिळवित अनोखी कामगिरी केली. 15 व 18 वर्षांखालील गटात विजेतेपद मिळवत तिने यंदाच्या मोसमाची थाटात सुरुवात केली.
मुलींच्या 18 वर्षांखालील गटात केवळ 14 वर्षांच्या पृथाने करोनाच्या आठ ते नऊ महिन्यांच्या विश्रांतीत कुठेही आपली परिपक्वता कमी झालेली नाही, हे दाखवून दिले. तिने अंतिम फेरीत सोलापूरच्या डावखुऱ्या समृद्धी कुलकर्णी हिचा 11-5, 11-6, 11-7, 11-5 असा एकतर्फी लढतीत पराभव केला.
सब-ज्युनियर गटात राष्ट्रीय विजेती असलेली पृथा करोनाच्या धोक्यामुळे गेल्या मोसमात एकाही स्पर्धेत सहभागी होऊ शकलेली नव्हती. टॉप स्पिन हे ड्राइव्हजचे मुख्य अस्त्र वापरून तिने संपूर्ण स्पर्धांमध्ये कमालीचे वर्चस्व राखले.
पृथाची खेळातील कारकीर्द खरेतर ऍथलेटिक्सपासून सुरू झाली. जिल्हास्तरावरील सहा वर्षांखालील मुलींच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत तिने रजतपदकही मिळविले होते. राज्यस्तरावरील रिलेतील सुवर्णपदक विजेत्या संघातही तिचा समावेश होता. मात्र, अचानक तिला टेबल टेनिसमध्ये गोडी वाटू लागली. तिने वयाच्या सहाव्या वर्षी टेबल टेनिसचा श्रीगणेशा केला. पृथाची मोठी बहीण पूर्वा टेबल टेनिस खेळायची. ते पाहून पृथालाही टेबल टेनिसची आवड निर्माण झाली. काही काळानंतर पूर्वाने टेबल टेनिस सोडले. मात्र, पृथाने टेबल टेनिसमध्येच कारकीर्द घडवायची या जिद्दीने खेळ कायम ठेवला. पृथा आक्रमकपणे खेळते. तिचे हॅंड-आय कोऑर्डिनेशन खूप चांगले आहे. नवनवीन गोष्टी अंगीकारण्यासाठी ती प्रचंड मेहनतही घेते. तांत्रिक बाजू सांगायची झाली तर वेगवेगळ्या प्रकारचे रबर आपल्या टेबल टेनिस बॅटवर वापरणाऱ्या खेळाडूंशी सातत्याने खेळण्याचा तसेच त्यांच्यासह सराव करण्याचा तिचा हेतू कायम असतो.
प्रत्येक खेळाडूचे ऑलिंपिकमधील पदक हेच लक्ष्य असते. पृथाने थेट ऑलिम्पिक पदक नव्हे तर, छोटी-छोटी कामगिरी डोळ्यांसमोर ठेवली आहे. तिचे आता सब-ज्युनियर गटात देशात अव्वल स्थान पटकावण्याचे ध्येय आहे. सध्या ती या क्रमवारीत पाचव्या स्थानावर आहे. राज्यात ती पहिल्या स्थानावर आहे. करोनाचा धोका काहीसा कमी झाल्यानंतर सुरू झालेल्या सब-ज्युनियर स्पर्धांत राष्ट्रीय विजेती बनण्याचे तिचे स्वप्न आहे. इतकेच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्पर्धांची पदक मिळविण्याचे तिचे ध्येय आहे. अर्थात, त्याआधी तिला राष्ट्रीय स्तरावर 15 वर्षांखालील मुलींच्या गटात पहिल्या स्थानावर येता आले पाहिजे. जागतिक क्रमवारीत पहिल्या दीडशेमध्ये तिने स्थान मिळवले तरच हे शक्य आहे. अर्थात हे देखील तिला माहिती असल्याने ती सध्या विविध स्पर्धांमधील सहभागासह जास्तीत जास्त वेळ सराव करण्यावर सध्या भर देत आहे. अत्यंत जिद्दी व मेहनती हेच तिच्याबाबत म्हटले पाहिजे.
तिच्या आजवरच्या कामगिरीवर नजर टाकली तरीही तिची विजिगिषू वृत्ती दिसून येते. नोएडाला 2017 साली झालेल्या आयटीटीएफ जागतिक ज्युनियर सर्किट इंडियन ज्युनियर अँड कॅडेट स्पर्धेत तिने ब्रॉंझपदक पटकावले होते. त्याच वर्षी सिलिगुडीत झालेल्या राष्ट्रीय मानांकन स्पर्धेतील 12 वर्षांखालील गटात तिने सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. हे वर्ष तिच्यासाठी प्रचंड यशाचे होते. याच वर्षी तिने नोएडात राष्ट्रीय मानांकन स्पर्धेतील 12 वर्षांखालील गटाचे सुवर्णपदकही प्राप्त केले. त्यानंतर या स्तरावर तिची कामगिरी काहीशी सुमार झाली. मात्र, तरीही खचून न जाता तिने पुन्हा एकदा यशाच्या मार्गावरून प्रवास सुरू केला. बडोद्याला गेल्या वर्षी झालेल्या राष्ट्रीय शालेय स्पर्धेत 14 वर्षांखालील मुलींच्या गटात तिने रजतपदक प्राप्त केले तर याच स्पर्धेच्या सांघिक गटात तिच्या मोलाच्या कामगिरीमुळे सुवर्णपदकही मिळाले.
विजयवाडा व गुवाहाटीला 2018 साली झालेल्या राष्ट्रीय मानांकन सब-ज्युनियर गटातही तिने सरस कामगिरी करताना ब्रॉंझपदक मिळवले. आजवरच्या तिच्या यशात तिची जिद्द व मेहनतीबरोबरच तिच्या पालकांनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच चमत्कार घडलेले आहेत. राज्यस्तरावर 19 तर जिल्हा पातळीवर तब्बल 40 स्पर्धा तिने जिंकल्या आहेत. रोहित चौधरी या मानवंत प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली तिचा खेळ मोठी उंची गाठत आहे.
पृथा ही नैसर्गिक आक्रमक खेळाडू असून सर्वसाधारण या गटातील मुलींपेक्षा तिचे कोर्ट कव्हर करण्याचे कौशल्य व सर्व्हिस अत्यंत वेगवान असतात. फोरहॅंड टॉपस्पिन तसेच फनी रबरवर खेळण्याचा तिचा हातखंडा आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटविण्याची क्षमता तिच्यात निश्चितच जाणवते. गेले तीन वर्षे ती राष्ट्रीय क्रमवारीत पहिल्या तीन खेळाडूंमध्ये असते हेच तिची कामगिरी सिद्ध करणारे आहे. येत्या काळात जिल्हा, राज्य, राष्ट्रीय, राष्ट्रकुल तसेच आशियाई व जागितक अशा विविध स्पर्धांमधील पदके तिला खुणावत आहेत. मात्र, या पदकांचा रंग सोनेरी असावा हीच तिच्याकडून अपेक्षा आहे.
– अमित डोंगरे