पुणे – करोनाच्या फटका बाजारपेठांसह सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांना देखील बसला आहे. त्यामुळे राज्यभरात ये-जा करणाऱ्या एसटी गाड्यांच्या प्रवाशांमध्ये घट झाली आहे. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे.
अनेकांनी करोनाच्या भीतीने नियोजित कामे रद्द केल्यामुळे एसटीला फटका बसला आहे. एसटीच्या प्रवासी संख्येत सुमारे 30 टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. शहरातील स्वारगेट, वाकडेवाडी आणि रेल्वे स्टेशन या तिन्ही एसटी बसस्थानकांतून मागील दोन दिवसांत नियोजित वेळापत्रकानुसार बस धावत होत्या.
मात्र, सर्वच भागांत जाणाऱ्या प्रवाशांची संख्या घटली आहे. दरम्यान, रेल्वे प्रवासी तोंडाला मास्क तसेच रूमालाचा वापर करीत आहेत.