केतकावळे -बोपगाव (ता. पुरंदर) येथील श्रीक्षेत्र कानिफनाथ गडावर फाल्गुन कृष्ण पंचमीला पहाटे मंदिरात श्री नवनाथ देवस्थान पंच कमिटी ट्रस्टच्या वतीने पूजा, अभिषेक करण्यात आला. दुपारी 12 वाजता नाथांची आरती झाली. त्यानंतर पारंपरिक वाद्यांच्या गजरात प्रथम देवांच्या अंगावर रंग शिंपण्यात आला. मंदिराच्या शिखरावरून भाविकांच्या अंगावर रंगांची शिंपण करून रंगपंचमीने यात्रा उत्साहात पार पडली.
कानिफनाथ गडावर अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन केले होते. सकाळी बोपगाव येथून पालखी-काठी वाजत कानिफनाथ मंदिरावर गेली. त्यानंतर औताडवाडी, होळकरवाडी, वडकी, उरुळी देवाची, सासवड, भिवरी, गराडे, चांबळी येथील मानाच्या शिखर काठ्यांनी रंगपंचमी आनंदोत्सव यात्रेत सहभाग घेतला. पुणे येथील हुतात्मा बाबू गेनू तुळशीबाग यांच्या वतीने सर्व भाविकांना सुगंधी दूध वाटप करण्यात आले. बोपगाव ते कानिफनाथ मंदिरापर्यंत सचिन सोनवणे (हडपसर) यांच्या वतीने मोफत वाहनसेवा पुरविण्यात आली होती.
सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डी. एस. हाके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राहुल घुगे, पोलीस कर्मचारी, होमगार्ड यांचा बंदोबस्त ठेवला होता. वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षल निताणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सहायक चंद्रकांत कुदळे, आरोग्य सेवक प्रशांत रासकर, कदम मोहिनी पारखे, सुजाता कटके, मंगल दळवी, सुरेखा लोणकर यांनी भाविकांना आरोग्य सेवा उपलब्ध करुन दिली.
श्री नवनाथ देवस्थान पंच कमिटी ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानोबा फडतरे, उपाध्यक्ष बापूसाहेब फडतरे, सचिव जयवंत फडतरे, खजिनदार शिवाजी जगदाळे, विश्वस्त नागेश फडतरे, नामदेव फडतरे, प्रकाश का. फडतरे, सुरेश फडतरे, आनंदराव फडतरे, प्रकाश फडतरे, दीपक फडतरे, ग्रामस्थांच्या वतीने सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरपंच सुरेखा फडतरे, उपसरपंच राम फडतरे,सर्व ग्रामपंचायत सदस्य आदीसह विविध सेवाभावी मंडळांनी यशस्वी नियोजन केले.