20 पाणीटाक्यांची होणार तपासणी : महापालिकेचे सीओईपीला पत्र
पुणे – तीस वर्षांपेक्षा जुन्या असलेल्या सुमारे 20 टाक्या धोकादायक बनल्या आहेत. त्या प्रामुख्याने दगडी तसेच डोंगर उतारावर आहेत. त्यांचे बांधकाम जीर्ण झाले आहे. त्यामुळे या टाक्यांचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे. याबाबतचे पत्र महापालिका प्रशासनाने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयास (सीओईपी) दिले आहे, अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिली.
शहरातील धोकादायक पाणी टाक्यांची स्थिती दैनिक “प्रभात’ने शुक्रवारी “पाण्याच्या टाक्या ढासळण्याचा धोका’ या वृत्ताद्वारे समोर आणली. यावर हे ऑडिट तातडीने करून देण्याची मागणी महापालिकेने सीओईपीकडे केली आहे. महापालिकेकडून समान पाणीपुरवठा योजना राबवण्यात येत आहे.
तर, सध्या शहरातील पाणीपुरवठा यंत्रणा, जलवाहिन्या आणि पाणी टाक्या सुमारे 40 ते 50 वर्षे जुन्या आहेत. सुमारे 2,500 कोटींच्या समान पाणी योजनेत महापालिकेकडून 83 नवीन पाणी टाक्या उभारण्यात येत असून सुमारे 1,600 किलोमीटरच्या नवीन जलवाहिन्या टाकण्यात येत आहेत. मात्र, हे काम पूर्ण होईपर्यंत जुन्याच टाक्यांद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
पाणी पुरवठ्यासाठी पालिकेने अनेक टाक्या डोंगर उतारावर बांधल्या आहेत. त्यात काहींचे बांधकाम दगडी आहे. ते आता ढासळत झाली आहे. त्यातील पर्वती आणि जनता वसाहत येथील धोकादायक टाकीची स्थिती दैनिक “प्रभात’ने उजेडात आणली आहे.
पाणीपुरवठा विभाग अभियंत्यांनी केलेल्या सर्वेक्षणात 19 ते 20 टाक्या धोकादायक असल्याचे समोर आले आहे. या टाक्यांची यादी सीईओपीला पाठवली आहे. आवश्यक पूर्तता करून लवकरच हे ऑडिट केले जाईल. धोकादायक टाक्या तातडीने दुरुस्त केल्या जातील. करोनामुळे अनेक कामे रखडली आहेत. तर, या ऑडिटलाही काही कालावधी लागणार आहे. त्यामुळे आणखी काही महिने या कामासाठी लागणार असले, तरी आवश्यक ठिकाणी दुरुस्ती केली जाईल.
-अनिरुद्ध पावसकर, विभागप्रमुख, पाणीपुरवठा, मनपा