कराड तालुक्यातील ओंड सारख्या गावातून फक्त महिलांच्या सक्षमीकरता बाहेर पडून त्यांना भक्कम पाठिंबा व आधार देण्याचे काम मधुराणी आनंदा थोरात करत आहेत. त्यांची ही चळवळ आता गावोगावी वाढत चालली आहे. एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटूंब सुशिक्षित बनते हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सर्व स्तरातील स्त्रियांना खंबीर बनविण्याचे त्यांचे कार्य वाखाणण्यासारखे आहे.
सौ मधुराणी आनंदा थोरात या ज्ञानदीप राष्ट्रीय सामाजिक व शैक्षणिक विकास संस्थेच्या माध्यमातून 2009 सालापासून आरोग्य, ग्रामीण विकास, शिक्षण, पर्यावरण व महिला बालकल्याण आणि कौशल्य विकास क्षेत्रात नाविण्यपूर्ण उपक्रम राबवित आहेत. कराडमधील ज्ञानदीप कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून शहरासह चौदाव्या वित्त आयोगातर्गंत गावापासून-वाडीवस्तीपर्यंत विविध कौशल्य विकास प्रशिक्षण देवून अनेकांना विशेषत: महिलांना व्यवसाय उभारणीसाठी मार्गदर्शन केले आहे.
राज्य महिला आयोगाच्या वतीने महिलांसाठी कायदे व हक्कविषयक आणि विशेषत: डिजिटल साक्षरता प्रशिक्षण व कार्यशाळा घेतली आहे. केंद्र सरकारच्या महिला व बालकल्याण मंत्रालयातर्गंत राष्ट्रीय जनसहयोग एवं बालविकास संस्थानच्या (निपसीड)असुरक्षित महिलांसाठी समुपदेशन विषयी कार्यशाळेत मिळालेल्या ज्ञानाद्वारे असुरक्षीत महिलांसाठी समुपदेशन करण्याचे काम त्या करत आहेत.
यशदाच्या माध्यमातून प्रशिक्षक म्हणून ग्रामविकास विकास आराखडा निर्मितीसाठी ग्रामपंचायत पदाधिकारी व गावस्तरावरील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे काम त्यांनी केले आहे. केंद्र सरकारच्या नेहरु युवा केंद्र, सातारा यांच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांत सहभागी होण्याबरोबरच कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी प्रशिक्षक म्हणूनही योगदान दिले आहे. नेहरु युवा केंद्राच्या विविध उपक्रमांत सहभाग नोंदविला आहे. सनबीम व ज्ञानदीप संस्थेच्या माध्यमातून महिलांसाठी डिजिटल साक्षरता कार्यशाळा यशस्वीपणे घेतल्या आहेत.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती योजना अभियान (कराड तालुका पंचायत समिती) येथे समूह साधनव्यक्ती (बीआरपी) म्हणून कार्य करताना महिला बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी योगदान दिले आहे. कराड पंचायत समिती स्तरावर महिला तक्रार निवारण समिती सदस्या म्हणून त्या कार्यरत आहेत. सामाजिक अंकेक्षण अंतर्गंत रोजगार हमी योजनेचे कराड तालुकास्तरावर सीआरपी म्हणून कार्यरत असताना रोजगार हमी योजनेच्या कामांची तपासणी करुन रोहयोचे महत्व आणि जॉबकार्ड धारकांचे हक्कांविषयी जागृती केली आहे. त्याचबरोबर अनेक सामाजिक उपक्रमात त्यांचा सहभाग आहे. डॉ. पंजाबराव देशमुख निर्वाहभत्ता योजनेंतर्गत सुरु असलेल्या यशवंतराव चव्हाण मुलींच्या वसतिगृहात नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी त्या योगदान देत आहेत.
कोरो, मुंबई यांच्या माध्यमातून एकल महिलांचे संघटन उभारण्यासाठी त्यांनी कापिल, गोळेश्वरसह कराड तालुक्यात चळवळ उभारण्यास प्रारंभ केला आहे. समाजात आजही अनाथ, परितक्त्या, विधवा महिलांना मानाचे स्थान मिळत नाहीत. कोणत्याही शुभ उपक्रमात त्यांना सहभागी करून घेतले जात नाही. त्यांच्यावर ओढावलेल्या या संकटामध्ये त्यांचा काहीच दोष नसतो. हे माहित असतानाही त्यांना अनेक गोष्टींपासून लांब ठेवले जाते. प्रत्येक गावात अशा महिलांची संख्या मोठी आहे. त्यांचे संघटन करून त्यांना मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी ज्ञानदीप, राष्ट्रीय, सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून मधुराणी थोरात यांनी पुढाकार घेतला आहे.
गत सात महिन्यांपूर्वी कापिल येथे सुमारे 45 एकल महिलांचे संघटन करण्यास या संस्थेस यश आले आहे. प्रत्येक गावात असे संघटन उभे करण्याचा संस्थेचा मानस आहे. एकल महिलांना एकसंघ करुन त्यांचा बचतगट उभारणीसह त्यांच्या आरोग्य, शिक्षण व उपजिविका याकरिता विविध उपक्रम राबविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला असून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्यकत्यांकरिता नेतृत्वविकास कार्यक्रम प्रभावीपणे राबवित आहेत. महिला व बालविकास विभागाच्यावतीने कराड येथील आशाकिरण महिलांचे शासकीय वसतिगृहात समुपदेशन करण्यासाठी त्यांना नियुक्त केले आहे.
नेहरु युवा केंद्राच्या उपक्रमांबरोबरच सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना नुकताच युवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
मधुराणी थोरात यांनी समाजातील महिलांसाठी उचलले पाऊल खरोखरच कौतुकास्पद व सर्व महिलांना अभिमानास्पद असेच आहे. सर्वच स्तरातील महिलांना बळकटी देऊन त्यांचे आर्थिक सक्षमीकरण करण्याचा त्यांचा मानस आहे.
-कौशल्य विकास प्रशिक्षणद्वारे महिलांना सक्षमीकरण
-न्याय -हक्कांसाठी योगदान
-विशाखा समितीच्या प्रभावी अंमलबजावणी
-एकल महिलांचे संघटन
-महिलांच्या शिक्षण व आरोग्यासाठी प्रयत्नशील
-किशोरवयीन मुलींसाठी मार्गदर्शनपर मेळावे
-कराड पंचायत समिती स्तरावर महिला तक्रार निवारण समिती सदस्य.
-रोजगार हमी योजनेचे कराड तालुकास्तरावर सीआरपी म्हणून कार्य
-ग्रामविकास आराखडा विषयी प्रविण प्रशिक्षक म्हणून कार्यरत
-आशाकिरण महिला वसतीगृहात समुपदेशक म्हणून नियुक्ती