मुंबई – राज्यातील स्थानिक स्वराज्य निवडणुकांची सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील तयारी सुरू केली असून मनसे प्रमुख राज ठाकरे सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांचा काही दिवसांतच पुणे दौरा होणार आहे. मात्र या दौऱ्याआधीच मनसेला जबर धक्का बसला असून मनसेच्या फायरब्रँड महिला नेत्या म्हणून ओळख असलेल्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे.
मागील काही दिवसांपासून रुपाली पाटील मनसे सोडणाऱ अशा चर्चांना उधाण आलं होतं. पक्षातील राजकारणामुळे आपण पक्ष सोडू शकतो, असंही त्यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं. त्याचवेळी त्यांनी शिवसेनेत दाखल होण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार आज त्यांनी पत्र पाठवून पक्षाच्या सदस्यत्वासह इतर पदांचा राजीनामा दिला आहे.
दरम्यान रुपाली पाटील यांनी युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांची आज मुंबईत भेट घेतली आहे. त्यामुळे त्या शिवसेनेत प्रवेश कऱणार अशा चर्चांना उधाण आलं आहे. त्यांनी राज ठाकरे यांनी पत्र पाठवून सर्व जबाबदाऱ्यांतून मुक्त होत असल्याचं म्हटलं आहे.
पत्रात त्यांनी म्हटल की, मी माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातील सर्व पदासह पक्षाचा प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देत आहे. आपण दिलेलं बळ नेहमी संघर्ष करण्याची प्रेरणा देत. यापुढेही आपले आशीर्वाद व “श्री.राज ठाकरे” हे नाव ह्रदयात कोरलेले कायम राहिल.