नगर – मनपा कामगार युनियनकडून 15 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात आज कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. कर्मचाऱ्यांनी अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कामकाज बंद ठेवले. दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आजची स्थायी समितीची अंदाजपत्रकीय सभा पुन्हा दुसऱ्यांदा स्थगित करण्यात आली.
मनपा कामगार युनियनने आज सकाळी मनपात आंदोलन केले. यावेळी घोषणाबाजी करून सभेचे कामकाज स्थगित करण्यात आली. स्थायी समितीचे सभापती कुमारसिंह वाकळे यांनी आजची अंदाजपत्रकीय सभा स्थगित केली. आता ही सभा उद्या (दि. 15) होणार आहे.
गेल्या शुक्रवारी स्थायी समितीची अंदाजपत्रकीय सभा स्थगित करण्यात आली होती. मनपा कामगार युनियनचे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी या सभेवर मोर्चा काढून सभेचे कामकाज रोखले होते.
त्यामुळे सभापती वाकळे यांनी दोन तासासाठी सभा तहकूब केली होती. त्यानंतर दुपारी स्थायी समितीची सभा होऊन या सभेत आयुक्त शंकर गोरे यांनी 802 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले होते. अंदाजपत्रकाचा अभ्यास करण्यासाठी शुक्रवारी सभा तहकूब करीत आज (सोमवारी) ही सभा ठेवली होती. या सभेत अंदाजपत्रकावर सविस्तर चर्चा केली जाणार होती मात्र कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे आजची सभा पुन्हा तहकूब करून उद्या सकाळी साडेअकरा वाजता स्थायीत चर्चा केली जाणार आहे.