-->

नगर जिल्ह्यात पुन्हा कडक निर्बंध

– मास्क न वापरणार्‍यांवर होणार दंडात्मक कारवाई
-शाळा-महाविद्यालये, हॉटेल, रेस्टॉरंटवरही असेल लक्ष्य
-भाजीपाला व व्यापारी संकुलांनाही दक्षतेच्या सूचना
– पोलीस अधीक्षक, आयुक्तांसह अधिकार्‍यांवर जबाबदारी

नगर (प्रतिनिधी) – करोनाचा प्रसार पुन्हा एकदा चिंताजनक स्थितीकडे जात असल्याने राज्य सरकारच्या आदेशावरुन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी आज नगर जिल्ह्यात पुन्हा कडक निर्बंध लागू केले आहेत. प्रामुख्याने लग्नसोहळे व अंत्यविधीला होणार्‍या गर्दीला नियंत्रणात आणण्याच्या सक्त सूचना त्यांनी दिल्या असून, पन्नासपेक्षा जास्त गर्दी करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगरपालिका आयुक्त, गटशिक्षणाधिकारी व जिल्ह्यातील नगरपालिकांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी व कर्मचार्‍यांच्या नव्या टीम त्यासाठी आज तयार करण्यात आल्या असून, त्यांना यावर सक्त लक्ष्य ठेवण्याची ताकीद देण्यात आली आहे.

अलिकडे करोना संपला, असा अप्रचार करणार्‍यांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे प्रामुख्याने लग्नसोहळे व अंत्यविधीला होणारी गर्दी वाढत आहे. विशेष म्हणजे त्यातील बहुतेक लोकांच्या तोंडाला मास्कही नसतो, ही वस्तुस्थिती आहे.

त्यामुळे असे लग्नसोहळे किंवा अंत्यविधीला गर्दी करणार्‍यांवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षक, महापालिका आयुक्त, तहसीलदार, गटशिक्षणाधिकारी किंवा नगरपालिका हद्दीत मुख्याधिकारी त्यांच्यावर कारवाई करतील, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिल्या आहेत.

शाळा, महाविद्यालयातील उपस्थित विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे तेथेही संसर्ग वाढू शकतो, अशी स्थिती आहे. त्यामुळे शाळांत सॅनिटायझर, हात धुण्यासाठी साबण वापरणे किंवा लक्षणे आढळणार्‍यांची तातडीने आरटीपीसीआर चाचणी करुन घेणे बंधनकारक करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

भाजीपाला किंवा शॉपिंग कॉम्प्लेक्समधील गर्दीही आता नियंत्रणाबाहेर जात असल्याचे दिसते. तेथे विक्रेत्यांनीही मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. रेल्वे किंवा अन्य सार्वजनिक प्रवासी वाहतुकीच्या ठिकाणीही दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मुख्यत्त्वे नगरमध्ये विनामास्क वावरणार्‍यांची संख्या वाढत असल्याने त्यांच्यावर सक्त कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नगरमधील हॉटेल्स, रेस्टॉरंटमधील गर्दीही चिंताजनक आहे. त्यावर कारवाईसाठी पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली टीम तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सर्वच सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही कार्यक्रमासाठी 50 पेक्षा जास्त लोकांची संख्या असूच नये, अशी ताकीद देण्यात आली आहे. तसे आढळल्यास तेथे तत्काळ कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत. करोनासाठी पुन्हा कडक निर्बंध लागू करण्यात आले असून, त्याचे उल्लंघन करणार्‍यांवर भादवि कलम 188 नुसार गुन्हे दाखल करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिल्या आहेत.

नगरमध्ये दररोज वाढणार्‍या रुग्णांची संख्या, उपचाराची स्थिती याबाबत दक्ष राहण्याच्या सूचना जिल्हा शल्यचिकित्सक व त्यांच्या टीमला देण्यात आल्या आहेत. दूध विक्रेते, फेरीवाले, दुकानदार यांना मास्क वापर बंधनकारक करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.