-->

12 वर्षाच्या जिया रायचा 36 किलोमीटर पोहण्याचा विक्रम

मुंबई, – कुमारी जिया राय या 12 वर्षांच्या मदन राय या नौदल कर्मचाऱ्याच्या मुलीने बांद्रा – वरळी सी लिंक ते गेट वे ऑफ इंडिया पर्यंतचे 36 किलोमीटर अंतर बुधवारी 08 तास 40 मिनिटात पोहत पार करून विक्रम नोंदवला. ही मुलगी स्वतः स्वमग्नता विकारग्रस्त (ऑटिझम स्पेक्‍ट्रम डिसॉर्डर) असून हा जलतरणाचा विक्रम तिने स्वमग्नता विकाराबद्दल जनजागृती करण्यासाठी केला आहे.

या विक्रमासाठी तिने 17 फेब्रुवारी रोजी पहाटे 03:50 वाजता बांद्रा-वरळी सी लिंक येथून प्रारंभ केला आणि दुपारी 12:30 वाजता ती गेट वे ऑफ इंडिया इथे पोहोचली. हा उपक्रम भारतीय जलतरण परीषदेच्या महाराष्ट्र जलतरण संस्था या मान्यताप्राप्त संस्थेच्या निरिक्षणाखाली घेण्यात आला. युवा आणि क्रीडा व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या फिट इंडिया या मोहिमेचे सहकार्य देखील या उपक्रमाला लाभले.

याचा पारितोषिक समारंभ बुधवारी गेटवे ऑफ इंडिया येथे झाला. कुमारी जिया हिला ग्रेटर मुंबई ऍमेच्युअर ऍक्वेटिक असोसिएशनच्या अध्यक्ष झरीर एन बालीवाला यांच्या हस्ते पदक देऊन गौरविण्यात आले.

कुमारी जिया राय हिने यापूर्वी दिनांक15 फेब्रुवारी 2020 रोजी एलिफंटा बेट ते गेटवे ऑफ इंडिया हे 14 किलोमीटर अंतर 03 तास 27 मिनिटात आणि 30 सेकंदात पोहत जाऊन पार केले आहे. स्वमग्न विकार असलेली 14 किलोमीटर जलतरण करणारी सर्वात लहान मुलगी असा विश्वविक्रम नोंदविला आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.