कराड -शासनाने लॉकडाऊन शिथील केल्याने कराड शहरात वर्दळ वाढली आहे. सोशल डिस्टन्सिंग नियमाचे उल्लंघन होत आहे. शिवाय व्यापारी, बॅंका, लिकर्स चालक आदी सर्व व्यापारी-विक्रेते नियमांचे उल्लंघन करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे बॅंकेत ग्राहकांसाठी टोकन पध्दतीचा वापर करा, कापड दुकानातील चेंजींगरूम बंद तर किराणा व अन्य व्यापाऱ्यांनी एक वेळेस पाचपेक्षा जास्त लोकांना प्रवेश देवू नये.
अन्यथा कारवाईला सामोर जावे लागेल, असा इशारा प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी दिला. दरम्यान, प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भविष्यात पोलीस प्रशासन कठोर कारवाई करणार असल्याचे पोलीस उपअधिक्षक सुरज गुरव यांनी सांगितले.
दरम्यान, कराड शहर कृति समितीच्या बैठकीत सात महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यावेळी शहरातील विविध विक्रेते, व्यापारी असोसिएशनसह नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी सूचना मांडल्या.
यावेळी तहसीलदार अमरदीप वाकडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, उत्पादन शुक्लचे निरीक्षक पाटील, मुख्याधिकारी यशवंत डांगे तसेच बॅंक, व्यापारी, दारू दुकान, हॉटेल, पानपट्टी, नाभिक संघटना आदींचे पदाधिकारी उपस्थित होते.
कराड शहरातील कृति समितीच्या पाचव्या बैठकीत सुमारे तीनशेहून अधिक लोकांनी सहभाग नोंदवला. यावेळी बी. आर. पाटील प्रशासनाची भूमिका मांडताना म्हणाले, जनसहभाग महत्वाचा आहे. करोनाच्या काळात सोशल डिस्टन्सिंगचे पालन, मास्कचा वापर तुम्ही व तुमच्या कुटुंबासाठी आहे, हे लक्षात घेण्याची गरज आहे. कराडमध्ये करोनाचा रूग्ण नाही. या भावनेतून आलेली शिथीलता घातक आहे. 60 वर्ष ते लहान मुले बाहेर पाठवणे घातक आहे. बाहेर पाठवणारे पालक बेफिकीर असल्याचे दिसत आहे. मनुष्य प्रजातीच्या विरूध्द काम करणारा हा व्हायरस आहे, हे सर्वांनी ध्यानात घेण्याची गरज आहे. पोलीस प्रशासनाने आतापर्यंत 5 हजारहून अधिक गुन्हे दाखल केले आहेत. तर 11 लाख 52 हजारांचा दंड वसूल केला आहे.
यशवंत डांगे म्हणाले, बॅंक, पोस्ट तसेच काही व्यापारी आणि दारू दुकानांसमोर सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नसल्याचे दिसून आले आहे. यासाठी बॅंकानी टोकन पध्दतीचा अवलंब करावा. लोकांना बसण्यासाठी सुरक्षित व्यवस्था करावी. बॅंकेतील सुरक्षा कर्मचारी अथवा बॅंक कर्मचाऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी आग्रही रहावे.
विजय वाटेगावकर म्हणाले, बॅंकांनी जास्तीतजास्त लोकांना चेकबूक द्यावीत. बॅंकेत बॅरेकेटींग करावे. याशिवाय रेडिमेड कपडे दुकानातील चेंजिंगरूम बंदच कराव्यात. या मागणीला जयंत बेडेकर यांनी पाठिंबा देत सर्वांना एकच नियम लावण्याची आग्रही मागणी केली. स्मिता हुलवान यांनी बॅंकातील गर्दी कमी करण्यासाठी व्यवहारांच्या प्रकारानुसार दिवस व वेळ निश्चित करावी, अशी सूचना मांडली. यावेळी शासनाच्या योजनातून मिळणारे पैसे घेण्यासाठी लोक गर्दी करत आहेत आणि ते पैसे काढले नाहीतर परत जातील, अशी लोकांची भावना झाल्याचे बॅंक अधिकारी यांनी सांगितले. यावेळी बॅंकेत जनजागृतीचे फलक लावून लोकांचे प्रबोधन करण्याची सूचना बी. आर. पाटील यांनी दिल्या.
बैठकीत घेण्यात आलेले निर्णय
1) बॅंकेत टोकन पध्दत, बॅरिकेटींग, वेटिंगरूम व पेन्शन धारकांसाठी स्वतंत्र दिवस राखीव ठेवण्यात यावा.
2) कापड दुकानातील चेंजिंग रुम ग्राहकांसाठी बंद राहिल.
3) देशी दारू दुकाने, वाईन शॉपमध्ये पार्सल पद्धतीने विक्री
4) नियम व कारवाईची माहिती दवंडीद्वारे देण्यात येईल
5) सलून व पानटपरी बाबत शासन आदेशाप्रमाणे कार्यवाही
6) दुकानात एकावेळी पाचपेक्षा अधिक ग्राहकांना प्रवेश बंद
7) डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी “मुकाबला डेंग्यूशी’ अभियान