कराड -रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यास 2019-20 हंगामात ऊस घातलेल्या शेतकरी सभासदांना प्रतिटन 250 रूपयांचा दुसरा हप्ता देण्याचा निर्णय कारखाना व्यवस्थापनाने जाहीर केला आहे. दि. 22 जूनपासून शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर ही रक्कम वर्ग केली जाणार असल्याची माहिती अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी दिली.
प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, कृष्णा कारखान्याने नेहमीच शेतकरीहिताला प्राधान्य दिले आहे. कारखान्याने 2019- 2020 च्या गळीत हंगामात 143 दिवसांत एकूण 11 लाख 16 हजार 500 मे. टन ऊस गाळप केले आहे. सरासरी साखर उतारा 12.61 राहिला आहे. तर 13 लाख 87 हजार 650 क्विंटल साखर निर्मिती कारखान्याने केली आहे. साखर उत्पादनात कृष्णा कारखाना राज्यात तृतीय क्रमांकावर आहे. तर ऊस गाळपात राज्यात चौथ्या क्रमांकावर आहे.
करोनाच्या प्रतिकूल काळातही शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन व्यवस्थापनाने कारखाना यशस्वीपणे चालविला आहे. तसेच शेतकऱ्यांच्या ऊसतोडी वेळेत व्हाव्यात म्हणून ऊसतोडणी कामगारांची विशेष काळजी घेत, कारखाना प्रशासनाने त्यांना अन्नधान्य व अन्य सेवा उपलब्ध करून दिल्या. तसेच हंगाम संपल्यानंतर त्यांना त्यांच्या गावी सुखरूप पाठविण्याची व्यवस्था केली. कृष्णा कारखान्याने यापूर्वी शेतकरी सभासदांना एफआरपी रक्कम 2,925 रूपयांपैकी 2500 रूपयांचा पहिला हप्ता अदा केला आहे. सध्याच्या लॉकडाऊनच्या स्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा, या उद्देशाने एफआरपीचा दुसरा हप्ता 250 रूपयांप्रमाणे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऊसबिलाची ही रक्कम येत्या दि. 22 जून दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.
साखर व उपपदार्थ निर्मितीत “कृष्णा’अग्रेसर
साखर उत्पादनाबरोबरच उपपदार्थांच्या निर्मितीत कृष्णा कारखाना यंदा अग्रेसर राहिला आहे. राज्यात साखर उत्पादनात कृष्णा कारखाना तृतीय क्रमांकावर आहे, तर ऊस गाळपात राज्यात चौथ्या क्रमांकावर आहे. तसेच कारखान्याने गेल्या हंगामात डिस्टलरी प्रकल्पात एक कोटी 55 लाख लिटर अल्कोहोलचे उत्पादन घेत त्यातून 50 लाख लिटर इथेनॉलची निर्मिती केली. तसेच को- जनरेशन प्रकल्पाच्या माध्यमातून पाच कोटी सात लाख 64 हजार युनिट वीजनिर्मिती करण्यात आली. यापैकी दोन कोटी 56 लाख 72 हजार 203 युनिट वीज निर्यात करण्यात आली आहे.