पुणे – पुणे मुंबई हायवेवर एक विचित्र अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एक नाही दोन नाही तर तब्बल अकरा वाहने एकमेकांना धडकली आहे. कहर म्हणजे यामध्ये एक फॉर व्हीलर अक्षरशः दुसऱ्या एका वाहनावर उभी राहिल्याचे [पाहायला मिळाले.
या विचित्र अपघातामुळे हायवेवर वाहतुकीचा चांगलाच खेळखंडोबा झाला होता. ऐन उन्हात हायवेवर ट्राफिक जॅम सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून आले. खोपोली एक्झिट जवळ हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
घटनास्थानी मदत कार्य सुरु करण्यात आले आहे. तब्बल अकरा वेगवेगळ्या गाड्या याठिकाणी एकमेकांना धडकल्याने बघ्यांची देखील मोठी गर्दी यावेळी झाली होती. गेल्या काही दिवसांपासून मुंबई पुणे हायवेवर अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहे.
अपघातानंतर या ठिकाणचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल व्हायला सुरुवात झाली.सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.