वाघोली, (प्रतिनिधी): राज्य सरकारने काढलेल्या सगेसोयरे अधिसूचनेचा कायदा करून ओबीसीमध्ये आरक्षण द्यावे अशी मागणी करत मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरु केले आहे. त्यांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी व आरक्षणाच्या मागणीसाठी पुणे नगर रोडवर वाघोलीत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सकल मराठा समाज बांधवांच्यावतीने शुक्रवारी (दि.१६) सायंकाळी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी एक मराठा लाख मराठा, जय जिजाऊ जय शिवराय, जय शंभूराजे, आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापचं अशा घोषणा देण्यात आल्या. मराठा समाज बांधवांनी सरकारच्या विरोधात प्रचंड संताप व्यक्त करत रास्ता रोको केला. शासनाने तात्काळ सगेसोयरे अधिसूचनेचा कायद्यासह अन्य मागण्या मान्य कराव्या अशी मागणी यावेळी मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली.
यावेळी लोणीकंद पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान, पोलिसांना निवेदन देण्यात आले. रास्ता रोकोमुळे वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. रास्ता रोको आंदोलनामध्ये मराठा बांधवांसह मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. रास्ता रोको आंदोलनाच्या पूर्वी सकाळी वाघोली पोलीस चौकीमध्ये आंदोलन करण्याची परवानगी मागितली गेली. पोलिसांनी परवानगीला नकार दिल्यानंतर चौकीतच ठिय्या आंदोलन करण्यात आले. त्यानंतर सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील यांनी मराठा बांधवांशी चर्चा करून निवेदन स्वीकारले.