चौकशी होईपर्यंत ठेकेदाराचे बिल थांबवा

शिवसेना उपनेते अनिल राठोड; शहरातील घनकचराप्रश्‍नी शिवसेनेची आक्रमक भूमिका

नगर  – शहरातील घनकचरा व्यवस्थापनात मोठ्या प्रमाणात गैरकारभार होत आहे. या संदर्भात शिवसेनेतर्फे महापालिका आयुक्तांकडे तक्रारही करण्यात आली आहे. मात्र, त्याची अजून चौकशीच झालेली नाही. त्यामुळे जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही. तोपर्यंत ठेकेदारास कामाच्या सादर झालेल्या बिलांपोटी अवघी तीस टक्के रक्कम अदा करावी. अन्यथा शिवसेनास्टाईल आंदोलन करावे लागेल, असा इशारा शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी आज दिला.

शिवसेना उपनेते राठोड यांनी आज महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांची भेट घेतली. शहरप्रमुख दिलीप सातपुते, युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम राठोड, उपजिल्हाप्रमुख गिरीष जाधव, माजी महापौर अभिषेक कळमकर, नगरसेवक अमोल येवले, संतोष गेनप्पा, आनंद लहामगे, गौरव ढोणे, मनीष गुगळे, विशाल वालकर, मंदार मुळे व महापालिका आरोग्याधिकारी अनिल बोरगे आदी यावेळी उपस्थित होते.

राठोड म्हणाले, शिवसेनेने पुराव्यासह नगरसेवकांच्या उपस्थित तक्रार केली. मात्र, त्याची गंभीर दखल न घेता किंवा चौकशी पूर्ण न करता ठेकेदारचे 60 टक्के बिल अदा करण्याचे निर्णय घेतला. पैसा जनतेचा आहे. त्याचा योग्य उपयोग व्हायला हवा. सहकारी अधिकारी दिशाभूल करत आहेत. त्यामुळे या प्रकाराची सखोल चौकशी होण्याची गरज आहे.
महापालिकेस आठ दिवसांचा अल्टीमेटम
घनकचऱ्यातील कथित गैरकारभाराची येत्या आठ दिवसांत चौकशी पुर्ण करावी. दोषींवर गुन्हा दाखल करावा. आठदिवसात या भ्रष्टाचारची चौकशी करून दोषींवर कारवाई न झाल्यास महापालिका आयुक्तांच्या दालनात बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशाराही राठोड यांनी यावेळी दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.