भेंडा – शेवगाव येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या मिरवणुकीवर समाजकंटकांकडून झालेल्या दगडफेकीच्या घटनेच्या निषेधार्थ रविवारी (दि. 21) सकल हिंदू समाज, श्रीशिवप्रतिष्ठान, राष्ट्रीय श्रीराम संघ यांच्यातर्फे भेंडा येथे दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला. दरम्यान, या वेळी सकल हिंदू समाजातर्फे नेवासे पोलिसांना दिलेल्या निवेदनात शेवगाव येथील समाजकंटकांवर मोक्कांतर्गत कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
सकल हिंदू समाजातर्फे पुकारण्यात आलेल्या भेंडा बंदला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सकाळी अकरा वाजता श्री शिव प्रतिष्ठान व राष्ट्रीय श्रीराम संघाचे निवेदन पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल यांना देण्यात आले. निवेदनात शेवगाव येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या मिरवणुकीवर दगडफेक करणाऱ्या समाजकंटकावर कडक कारवाई करण्यात यावी. तसेच त्यांना मदत करणाऱ्यांचीही चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली.