मुंबई – रिझर्व्ह बॅंकेच्या उदार पतधोरणानंतर बुधवारी शेअर बाजार निर्देशाकांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. काही गुंतवणूकदारांनी गुरुवारी सकाळी नफा काढून घेतल्यामुळे निर्देशांक कमी झाले. मात्र नंतर दीर्घ पल्ल्याचा विचार करून खरेदी करणाऱ्यांनी बरीच खरेदी केल्यामुळे शेअर बाजार निर्देशांक सलग दुसऱ्या दिवशी वाढले.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 157 अंकांनी वाढून 58,807 अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 47 अंकांनी म्हणजे 0.27 टक्क्यांनी वाढून 17,516 अंकांवर बंद झाला.
ओमायक्रॉन फारसा संहारक नसल्यामुळे जागतिक शेअर बाजारात गेल्या काही दिवसापासून सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे भारतीय शेअर बाजारात खरेदी वाढल्याचे वातावरण असल्याचे जीओजी वित्तीय सेवा या संस्थेचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले. मात्र काही गुंतवणूकदार सध्याच्या परिस्थितीतही नफा काढून घेण्याच्या मनस्थितीत असल्यामुळे निर्देशांकांत अस्थिरता आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज, आयटीसी, महिंद्रा, एशियन पेंट्स, इन्फोसीस, बजाज फायनान्स या कंपन्यांनी निर्देशांकांना चांगला आधार दिला. मात्र एचडीएफसी बॅंक, टायटन, नेस्ले, एनटीपीसी, पावर ग्रिड या कंपन्यांच्या शेअरची विक्री करून गुंतवणूकदारांनी नफा काढून घेतला.
फेडरल रिझर्व्हच्या निर्णयाकडे लक्ष
गेल्या दोन वर्षात अमेरीकेची रिझर्व्ह बॅंक असलेल्या फेडरल रिझर्व्हने उदार पतधोरण जाहीर केले होते. त्यामुळे बाजारात अतिरिक्त भांडवल निर्माण झाल्यामुळे महागाई वाढत आहे. ही महागाई रोखण्यासाठी फेडरल रिझर्व्हने कडक पतधोरणाचे संकेत दिले आहेत. लवकरच अमेरिकेच्या महागाईची नवीन आकडेवारी जाहीर होणार आहे. त्या आधावर फेडरल रिझर्व्ह आगामी काळात निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणूकदाराचे अमेरिकेतील महागाई आणि फेडरल रिझर्व्हच्या प्रतिक्रियेकडे लक्ष लागले आहे.