मुंबई – काही बॅंकांनी सादर केलेल्या ताळेबंदात अनुत्पादक मालमत्ता वाढल्याचे दाखवले आहे. त्यामुळे सोमवारी शेअर बाजारात बरीच नफेखोरी होऊन शेअर बाजार निर्देशांक घसरले.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स तब्बल 586 अंकांनी कमी होऊन 52,553 अंकांवर बंद झाला. विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 1.07 टक्क्यांनी म्हणजे 171 अंकांनी कोसळून 15,752 अंकांवर बंद झाला.
एचडीएफसी बॅंक, रिलायन्स इंडस्ट्रीज, ऍक्सिस बॅंक, मारुती, बजाज फायनान्स या कंपन्यांना आज जबरदस्त विक्रीचा मारा सहन करावा लागला. मात्र अशा परिस्थितीमध्ये एनटीपीसी, नेस्ले, डॉक्टर रेड्डीज, सन फार्मा या कंपन्यांच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ नोंदली गेली.
याबाबत विश्लेषकांनी सांगितले की, एचडीएफसी बॅंकेने जाहीर केलेल्या ताळेबंदामध्ये अनुत्पादक मालमत्ता वाढण्याची लक्षणे दिसत आहेत. त्यामुळे आज बॅंकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची जास्त प्रमाणात विक्री झाल्याचे दिसून आले.
त्याचबरोबर वाहन आणि धातू क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरच्या भावात होती घट नोंदली गेली. छोट्या कंपन्यांच्या शेअरच्या भावातही मोठ्या प्रमाणात घट झाल्यामुळे मिड कॅप आणि स्मॉल कॅप कोसळले. करोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे जागतिक बाजारातूनही नकारात्मक संदेश आले. त्यामुळे निर्देशांकांना आधार मिळाला नाही. निर्देशांक प्रशांत कोसळल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीही दोन टक्क्यापर्यत कमी झाल्याचे दिसून आले.