मुंबई – अमेरिकेत व्याजदरवाढीचे शक्यतेमुळे गेल्या चार दिवसापासून शेअर बाजाराचे निर्देशांक कमी झाले होते. त्याचबरोबर रिझर्व्ह बॅंकेने व्याजदरात 0.35% ची वाढ केल्याचाही परिणाम शेअर बाजार निर्देशांकावर झाला. मात्र आज निवडक खरेदी झाल्यामुळे शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 160 अंकांनी वाढून 62,270 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 48 अंकांनी वाढून 18,609 अंकांवर बंद झाला.
आज खरेदीसाठी गुंतवणूकदारांनी बॅंकिंग आणि वाहन क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची निवड केली. परदेशी संस्थागत गुंतवणूकदार विक्री करत असूनही देशातील गुंतवणूकदारांनी निवडक खरेदी केल्यामुळे शेअर बाजाराचे निर्देशांक वाढू शकले. ऍक्सिस बॅंक, इंडसइंड बॅंक, एल अँड टी, आयसीआयसीआय बॅंक, इन्फोसिस, स्टेट बॅंक, बजाज फिनसर्व, महिंद्रा या कंपनीच्या शेअरच्या भावात 2.51 टक्क्यापर्यंत वाढ झाली.
तर सन फार्मा, पावर ग्रीड, नेस्ले, विप्रो, कोटक बॅंक, बजाज फायनान्स या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला. अमेरिकेच्या पतधोरण समितीची बैठक या आठवड्यात होणार आहे. या बैठकीत काय निर्णय होतो याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.
गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाचा विजय झाल्यामुळे गुंतवणूकदार सुखावले असल्याचे दिसून येते. दरम्यान फेडरल रिझर्व व्याजदरात वाढ करण्याची शक्यता असल्यामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदाराकडून विक्री चालू असून काल या गुंतवणूकदारानी 10,241 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केल्याचे आकडेवारी शेअर बाजारानी जारी केली आहे.
खनिज तेलाचे दर बरेच कमी झाले असल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला आणि रुपयाला आधार मिळण्याची शक्यता आहे. सध्या कच्च्या तेलाचे दर 77 डॉलर प्रति पिंपावर आले आहेत. त्यामुळे जागतिक बाजारातून नकारात्मक संदेश येऊनही भारतीय बाजारात गुंतवणूकदारांनी खरेदी केल्याचे दिसून येत आहे.
काल रिझर्व्ह बॅंकेने जाहीर केलेल्या पत धोरणात व्याजदरात केवळ 0.35 टक्केची वाढ केली आहे. त्याचबरोबर विकासदर 6.8% राहील असे रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे. महागाई नियंत्रणात आली असून आगामी काळात ते सहा टक्क्यापेक्षा कमी होईल असे रिझर्व्ह बॅंकेला वाटते. या सर्व घडामोडीमुळे भारतीय शेअर बाजार बाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले होते असे विश्लेषकांनी सांगितले.