मुंबई – ज्या सरकारी बॅंकांची निर्गुंतवणूक करायची आहे, त्या यादीत इंडियन ओव्हरसीज बॅंक आणि सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाचे नाव आहे. त्यामुळे या दोन बॅंकांच्या शेअरचा भाव गेल्या काही दिवसापासून वाढत आहेत. आजही या दोन बॅंकांच्या शेअरचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले.
इंडियन ओव्हरसिज बॅंकेच्या शेअरचा भाव आज पाच टक्क्यांनी वाढून या शेअरचा भाव 24.80 रुपये प्रति शेअर या पातळीवर गेला. बरोबर सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया या बॅंकेच्या शेअरचा भाव 3.72 टक्क्यांनी वाढून 25.10 रुपये प्रति शेअर या पातळीवर गेला.
मुख्य निर्देशांक जैसे थे
दरम्यान महागाई वाढण्याची शक्यता असल्यामुळे जागतिक शेअर बाजाराचे निर्देशांक कमी होत असले तरी भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक मात्र कमी-अधिक प्रमाणात वाढत आहेत. निर्देशांक उच्च पातळीवर असल्यामुळे खरेदी-विक्रीच्या लाटा येत आहेत. खरेदी-विक्रीच्या लाटानंतर मंगळवारी शेअर बाजाराचे मुख्य निर्देशांक कालच्या पातळीच्या दरम्यान राहिले.
बाजार बंद होताना राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 26 अंकांनी वाढून 15,772 अंकांवर बंद झाला तर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 14 अंकांनी वाढून 52,588 अंकांवर बंद झाला. भारतात करोना रुग्णांची संख्या कमी आहे. लसीकरण झपाट्याने वाढत असल्यामुळे अर्थव्यवस्था वेगाने पुनरुज्जीवित होईल असे गुंतवणूकदारांना वाटत आहे.