पुणे जिल्हा: रिफ्लेक्‍टर लावा; अपघात टाळा

जिल्ह्यातील टोलनाक्‍यांवर वाहतूक शाखेकडून प्रबोधन

मिलन म्हेत्रे

पुणे – लॉनऑननंतर आता सगळ्याच प्रणाली हळूहळू सुरू होऊ लागल्या आहेत. त्यात वाहतूक व्यवस्था प्रमुख आहे. लॉकऑननंतर आता पन्हा या व्यवस्थेवरील नियमांचे काटेकोर पालन सुरू झाले असून, हाय-वे वरून जाणाऱ्या गाड्यांना रिफ्लेक्‍टर अनिवार्य करण्यात आले आहे.

या प्रक्रियेच्या जनजागृतीसाठी खेड-शिवापूर टोल नाक्‍याजवळ महामार्ग पोलीस आणि टोल नाका प्रशासनाने रिफ्लेक्‍टर नसलेल्या काही गाड्यांना रिफ्लेक्‍टरचा पुरवठा केला आहे आणि नियमांचे पालन करण्याबाबत जागरूकता प्रयत्न केला आहे.

जडवाहनांसह छोट्या-मोठ्या वाहनांना रिफ्लेक्‍टरबाबतची जनजागृती मोहीम महाराष्ट्र राज्य वाहतूक शाखेचे अप्पर पोलीस महासंचालक भूषणकुमार उपाध्याय यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. करोनाबाबतचे सरकाराने दिलेल्या नियमांचे पालन करीत जिल्हाबंदी उठवल्यावर रस्त्यावरील वाहतुकीमध्ये बऱ्याच प्रमाणात वाढ झाली आहे.

मात्र, असे असले तरी सध्या वाहनचालकांकडून अनेक नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे. त्यातच हाय-वे वरून जाणाऱ्या ट्रक, कंटेनर, ट्रॅक्‍टर आणि इतर जडवाहतूक करणाऱ्या गाड्यांना मागच्या बाजूला लावण्यात येणाऱ्या रिफ्लेक्‍टरचा अभाव दिसून आला आहे.

महाराष्ट्र राज्य वाहतूक शाखेने वाहनचालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अवजड वाहनांना रिफ्लेक्‍टर लावण्यासाठी प्रबोधन करण्याबाबत महामार्ग पोलीस आणि टोल प्रशासनास आदेश दिलेले असून त्यानुसार हे कार्य करण्यात येत आहे. याबरोबरच रिफ्लेक्‍टरशिवाय महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांवर आता बारीक नजर ठेवण्यात येणार आहे. नॅशनल महामार्ग क्र. 4 (पुणे सातारा महामार्गावर) जानेवारी ते जुलै 2020 दरम्यान 75 अपघात झाले, त्यात 64 जण गंभीर जखमी झाले.

गतिरोधकांनाही रिफ्लेक्‍टर आवश्‍यक
सार्वजनिक बांधकाम विभागाने महामार्गांवर अनेक ठिकाणी गतिरोधक तयार केले आहेत. मात्र, या गतिरोधकांना रिफ्लेटर बसवणे गरजेचे आहे. याबरोबरच रस्त्यांवरील साईड पट्ट्यांजवळही असे रिफ्लेक्‍टर आवश्‍यक असल्याने त्याचीही पूर्तता त्वरीत करण्यात यावी, अशी मागणी प्रवासी आणि वाहनचालक करीत आहेत.

रिफ्लेक्‍टरची आवश्‍यकता
ब्रेकडाऊनमुळे किंवा इतर कारणामुळे नादुरुस्त झालेली गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली असल्यास रिफ्लेक्‍टरमुळे मागील गाडीला सावध राहण्याचा इशारा मिळतो. ट्रक, ट्रॅक्‍टरकंटेनरसारख्या मोठ्या गाड्यांचा मागील वाहनचालकांना अंदाज येतो. बॅक लाइट्‌स लावले नसतील किंवा रिफ्लेटर नसेल तर मागून येणाऱ्या गाड्यांना या गाड्या दिसल्या नाहीत, तर अपघात होण्याची निश्‍चितच असते.

ऊसवाहतूक ट्रॅक्‍टर्सना रिफ्लेक्‍टर आवश्‍यक
जिल्ह्यात अनेक ठिकाणी आता साखर कारखाने सुरू होतील. यावेळी शेतात ऊसतोड करून ट्रॅक्‍टरने कारखन्यात पोचोहवला जाईल. मात्र, या ट्रक्‍टर्सना मागील बाजूस रिफ्लेक्‍टर्स लावणे अनिवार्य आहे. अनेकवेळा ट्रॅक्‍टरचालक बॅकलाइट्‌स किंवा रिफ्लेक्‍टर लावत नाहीत त्यामुळे मागून येणाऱ्या भरधाव वाहनांमुळे महामार्गावर ट्रॅक्‍टरचे अपघात वाढत आहेत.

महामार्गांवरून जाताना रिफ्लेक्‍टर अनिवार्य आहे. काही कारणाने जडवाहन नादुरूस्त झाले आणि रस्त्याच्या बाजूला लावले असेल तर मागून येणाऱ्या गाड्यांना या गाडीच्या रिफ्लेक्‍टरमुळे सावधगिरीचा इशारा मिळून अपघात टळण्यास मदत होत असते. याबरोबर पथदिवे नसलेल्या भागात देखील या रिफ्लेक्‍टर्सचा चांगला उपयोग होतो. मात्र, महामार्गावरून जाताना या छोट्या नियमांकडे दुर्लक्ष होते आणि परिणामी अपघातांना निमंत्रण दिले जाते. त्या दृष्टीने रिफ्लेक्‍टरबाबत सध्या प्रबोधन सुरू आहे.
– प्रवीण रणदिवे, सहायक पोलीस निरीक्षक, पुणे-सातारा महामार्ग, सारोळा

Leave A Reply

Your email address will not be published.