रसाहाराविषयी…फळांचे रस आणि त्यांचे उपयोग

Madhuvan

शरीरातील शक्‍ती टिकवून धरतात मोसंबी

मोसंबी हा एक लिंबाचीच जात आहे. मोसंबी मधुर रसाने युक्‍त असणारे फळ आहे. आजारपणात मोसंबी हे फळ आरोग्यास उपयुक्‍त ठरते. पातळ साल व गोड चवीच्या मोसंबीत विशेष गुणधर्म असतात.

गुणधर्म ः मोसंबी मधुर, रुचकर, शीतल, शरीरास संतोष देणारी, तृषाहारक, स्फूर्तिदायक, जुलाबात गुणकारी, वीर्यवर्धक व बलवर्धक आहे. वात, पित्त, कफ, उलटी, घशाला कोरड पडणे, रक्‍तदोष आणि अरुचीमध्ये मोसंबी गुणकारी आहे. मोसंबीमध्ये असणारे क्षार रक्‍तातील आम्लता कमी करतात. मोसंबीचा रस प्राशन केल्याने जीवनशक्‍ती व रोगप्रतिकारकशक्‍ती वाढते.

घटक : जीवनसत्त्व “ए’, लोह 0.3 मि. ग्रॅम, जीवनसत्त्व “सी’ 63 मि. ग्रॅम. पाणी 84.6 टक्‍के, प्रोटिन 1.5टक्‍के, चरबी 1.0 टक्‍के, कार्बोदित पदार्थ 10.9 टक्‍के, कॅल्शियम 0.09 टक्‍के, फॉस्फरस 0.02 टक्‍के.

औषधी उपयोग ः मोसंबी चावून खाल्ल्याने त्याच्या रसामुळे दात मजबूत होतात. त्यातील रेषातत्त्वामुळे बद्धकोष्ठता दूर होते. मोसंबीमधून अधिक घटक प्राप्त करावयाचे असल्यास मोसंबीच्या रसाचे सेवन करावे. कफ प्रकृतीच्या लोकांनी मोसंबीचा रस थोडा गरम करून घ्यावा किंवा दोन चमचे आल्याचा रस त्यात मिसळून तो घ्यावा. तापात आहारावर बंधनं पडतात अशा वेळी शक्‍ती टिकवून ठेवण्यासाठी व शरीराच्या पोषणासाठी मोसंबीचा रस अत्यंत गुणकारी आहे. या रसामुळे पोटातील आम्लता कमी होते, भूक चांगली लागते आणि पचनाच्या सर्व तक्ररी दूर होतात.

यकृत जठर व आतडी कार्यक्षम करणारे अंजीर

अंजीर हे ग्रीस, दक्षिण युरोप, अल्जेरिया, इटली वगैरे देशात मोठ्या प्रमाणात होणारे फळ आहे. काश्‍मीर, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरातमध्ये या फळाचे उत्पादन जास्त होते. अंजिराचा मोसम एकदा पावसाळ्यात व एकदा उन्हाळ्यात येतो. उन्हाळी फळ पावसाळी फळापेक्षा उत्कृष्ट असते. पिकलेले हिरवे अंजीर खूप स्वादिष्ट व रसाळ असते.

गुणधर्म ः अंजीर हे पित्तशामक, वायुहारक व रक्‍तविकार नष्ट करणारे असे फळ आहे. पिकलेले अंजीर मधुर, शीतोपचारी व सारक असते. हिरवी अंजिरे अत्यंत पौष्टिक असतात. त्यांच्या सेवनाने बद्धधकोष्ठता दूर होते. हिरव्या अंजिरात सामावलेले लोह पचनसुलभ असतात. अंजिरे शीत, मधुर असतात.

घटक ः हिरव्या अंजिरापेक्षा सुकलेल्या अंजिरात क्षार व शर्करेचे प्रमाण तिप्पट-चौपट असते. अंजिरात असलेल्या शर्करेपैकी बरीचशी शर्करा निसर्गतः फ्रुक्‍टोज स्वरूपात असते. सुक्‍या अंजिरातील अनेक प्रकारांत 60 टक्‍के इतकी शर्करा डॅक्‍स्ट्रोज शर्करा असते. अंजिरामध्ये सोडियम क्षारांचे प्रमाण भरपूर असते. याशिवाय पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, तांबे, मॅग्नेशियम, फॉस्फरस, सल्फर तसेच क्‍लोरिन विशेष प्रमाणात असते. हिरव्या अंजिरात “ए’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते; पण “बी’ आणि “सी’ जीवनसत्त्वाचे प्रमाण मात्र कमी असते. पाणी 80.8 टक्‍के, प्रोटीन 3.5 टक्‍के, चरबी 0.2 टक्‍के, कार्बोदित पदार्थ 18.7 टक्‍के, तंतू 2.3 टक्‍के, क्षार 0.7 टक्‍के, कॅल्शियम 0.06 टक्‍के , फॉस्फरस 0.03 टक्‍के, लोह 100 ग्रॅम, जीवनसत्त्व “ए’ 100 ग्रॅम.

औषधी उपयोग ः पिकलेल्या अंजिराचा रस काढता येतो. 12 महिने ताजी अंजिरे मिळत नाही तेव्हा सुक्‍या अंजिरांचा उपयोग करावा, कारण ती देखील ताज्या अंजिरांइतकीच पोषक द्रव्यांनीयुक्‍त असतात. सुकी अंजिरे पाण्यात 12 तास भिजवल्यास ती चांगली नरम बनतात. भिजवल्याने अंजिरांतील सुप्तावस्थेतील घटक कार्यरत होऊन सक्रिय बनतात. अशा भिजवलेल्या अंजिरांपासूनही थोड्या प्रमाणात रस काढता येतो. ज्या पाण्यात अंजिरे भिजत घातली असतील ते पाणीही प्यावे.

कफ व कोरड्या खोकल्यावर अंजिराचा रस उपयुक्‍त आहे. लहान मुलांनी व गर्भवती स्त्रियांनी शक्‍तिवर्धनसाठी अंजीर खावे. हिरव्या अंजिरांचा रस मूत्रउत्तेजक आहे. त्यामुळे त्या रसाने सर्व प्रकारचे मूत्रविकार दूर होतात. या रसपानाने यकृत, जठर आणि आतडी कार्यक्षम बनतात, मलावरोध दूर होतो, थकवा नाहीसा होतो आणि शरीरातील दुर्बलता नष्ट होऊन उत्साह वाढतो.

शरीरातील पेशीत पाणी होऊ न देणारे अननस

अननस हे फळ मुख्यत्वे ब्राझिलमधले. पोर्तुगीज लोकांनी अननसाचे फळ भारतात आणले, असे मानले जाते. भारतामध्ये जवळजवळ सर्वत्र अननसाची लागवड होते. येथे जुलै ते नोव्हेंबरपर्यंत अननस मुबलक मिळतात. सिंगापूर, ब्रह्मदेश, मलाया आणि फिलिपाइन्समधील अननस उत्कृष्ट मानली जातात. अननसाच्या रसात असलेले क्‍लोरिन मूत्रपिंडाला सौम्य उत्तेजन देते तसेच ते शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर
फेकण्याचे काम करते.

गुणधर्म ः पिकलेले अननस मूत्रगामी, कृमिनाशक व पित्तशामक आहे. ते रुचकर, पाचक व वायुुहारक आहे. ते पचायला मात्र जड असते. हृदयासाठी ते अत्यंत हितकारक असून पोटाचे विकार, कावीळ व पांडुरोगावर गुणकारी आहे.

घटक ः अननसामध्ये असणाऱ्या एकूण आम्लप्रधान द्रव्यांपैकी 87 टक्‍के सायट्रिक ऍसिड असते व 13 टक्‍के मॅलिक ऍसिडचा भाग असतो. ही ऍसिडस क्षारधर्मी असल्याने शरीराला अत्यंत उपयुक्‍त असतात. पाणी 86.5 टक्‍के, प्रोटीन 0.6 टक्‍के, चरबी 0.1 टक्‍के, शर्करा 12.0 टक्‍के, कॅल्शियम 0.12 टक्‍के, फॉस्फरस 0.01 टक्‍के, लोह 100 ग्रॅम, जीवनसत्त्व “ए’ 100 ग्रॅम, जीवनसत्त्व “बी’ 100 ग्रॅम, जीवनसत्त्व “सी’ 100 ग्रॅम, 12 टक्‍के शर्करा. त्यापैकी 4 टक्‍के शर्करा ग्लुकोजच्या स्वरूपात असते व 7.5 टक्‍के इक्षुशर्करेच्या स्वरूपात असते.

औषधी उपयोग ः अननसातील जंतुनाशक गुण आयुर्वेदाने मान्य केला आहे. अननसाचा रस पित्तहारक, कृमिनाशक तसेच हृदयास अत्यंत हितकारक व पोषक असा आहे. अननसात ब्रास्मेलिन एन्झाइम नावाचे पाचकद्रव्य असते. त्यामुळे प्रथिनद्रव्ये (प्रोटीन्स) पचविण्यास त्याची मदत होते व पचनसंस्था कार्यक्षम बनवते. अननस उपाशीपोटी खाऊ नये. खाण्यापूर्वी त्याची साल व मधला कठीण दांड्यासारखा भाग काढून टाकावा. राहिलेल्या भागाचे तुकडे करून त्याचा रस काढून तो करावा. गर्भवती स्त्रियांनी कच्चे अननस खाऊ नये. तसेच पिकलेले अननसदेखील फार खाऊ नये.

औषधी उपयोग ः घशांच्या विकारात अननसाचा ताजा रस अत्यंत गुणकारी ठरतो. घटसर्प तसेच घशातील व तोंडातील संसर्गजन्य रोगांची तीव्रता कमी करण्यासाठी हा रस अत्यंत परिणामकारक असतो. अननसाच्या रसामध्ये असणारे क्‍लोरिन मूत्रपिंडाला उत्तेजित करते व ते कार्यक्षम बनवते. शरीरातील विषारी द्रव्ये आणि कचऱ्याचा निचरा अननस रसाच्या सेवनाने होतो. अननसाचा रस पित्तहारक, कृमिनाशक तसेच हृदयास अत्यंत हितकारक व पोषक असा आहे. तसेच शरीरातील पेशींमध्ये पाणी न होऊ न देण्यात अननसाचा रस खूपच मदत करतो.

मूत्राशयाच्या विकारावर कलिंगड

कलिंगड हे मूळचे आफ्रिकेचे. उन्हाळ्यात तर क्षुधा शमवणारे फळ आहे. हे फळ आकाराने गोल, लांबट गोल आणि वजनाने एक-दीड किलोपासून दहा-बारा किलो इतके मोठे असते. या फळाच्या आतील गर लाल रंगाचा असतो. हा गर खाण्यास अत्यंत मधुर असतो. या गरामध्ये काळ्या रंगाच्या बिया असतात.

गुणधर्म ः कलिंगड मधुर, मूत्रगामी, शीतकारक, बलवर्धक, तृप्तिकारक, पौष्टिक व पित्तहारक असते

घटक ः पाणी 95.7 टक्‍के, प्रोटीन 0.1 टक्‍के, चरबी 0.2टक्‍के, कार्बोदित पदार्थ 3.8 टक्‍के कॅल्शियम 0.1 टक्‍के, फॉस्फरस 0.01 टक्‍के, लोह 100 ग्रॅम, नियासिन 100 ग्रॅम, जीवनसत्त्व “बी’ 100 ग्रॅम, जीवनसत्त्व “इ’ 100 ग्रॅम.

औषधी उपयोग ः कलिंगडाच्या फोडी खाल्ल्या तरी भरपूर रस पोटात जातो. रसाच्या स्वरूपात सेवन केल्यास शरीराला अधिक पोषक घटक मिळू शकतात.

औषधी उपयोग ः शारीरिक व मानसिक थंडाव्यासाठी व मनाच्या स्थिरतेसाठी कलिंगडाच्या रस चांगला. शरीरातील नवनिर्मितीच्या क्रियेला कलिंगड रसाच्या सेवनाने गती प्राप्त होते. पोटाच्या अनेक व्याधींवर कलिंगडाचा रस उपयुक्‍त असतो. पोटातील दाह कमी होण्यासही उपयुक्‍त असतो. या फळात मूत्रगामी गुण असल्याने मूत्रपिंड आणि मूत्राशयाच्या विकारांवर कलिंगड रस गुणकारी आहे.

पोटातील दाह कमी करणारे खरबूज
नदीकिनारी व रेताड भागात खरबूज फळाचे उत्पादन होते.

गुणधर्म ः खरबूज शीतकारक आणि मूत्रगामी आहे. ते तृषाशामक आहे. रणरणत्या उन्हात शरीराला थंडावा देणारे हे फळ आहे.

घटक ः खरबूजामध्ये “ए’ आणि “सी’ जीनवसत्त्वांचे प्रमाण अल्प आहे. खरबुजामध्ये उपलब्ध असणारी साखर पूर्वपाचित असल्याने तिच्यातून शरीराला त्वरित पोषक घटक प्राप्त होतात. पाणी 95.9 टक्‍के, प्रोटीन 0.1 टक्‍के, चरबी 0.1 टक्‍के, कार्बोदित पदार्थ 3.9 टक्‍के, कॅल्शियम 0.11 टक्‍के, फॉस्फरस 0.01 टक्‍के , सोडियम 0.01 टक्‍के, लोह 100 ग्रॅम.

औषधी उपयोग ः खरबूजाचा रस शक्‍तिदायी मूत्रल आहे. तसेच तो मूत्राशयाच्या रोगांमध्ये गुणकारी आहे. खरबूज कफकारक असल्याने दमा असणाऱ्यांनी व कफ प्रकृतीच्या लोकांनी हे फळ जपून खावे किंवा याचा रस किंचित गरम करून मग प्राशन करावा. खरबुजामध्ये पाण्याचा अंश अधिक असतो. जुनाट खरजेवर खरबुजाचा रस म्हणजे एक रामबाण उपाय आहे. खरबूज शीतकारक असल्याने त्याच्या सेवनाने पोटातील दाह शांत होतो. खरबुजामध्ये असणारे क्षार शरीरातील आम्लता दूर करतात. मलावरोध नाहीसा होतो.

पाचक आणि किडनीसाठी पेरू

पेरू हे मूळचे दक्षिण अमेरिकेचे फळ आहे. थंडीमध्ये ते मुबलक प्रमाणात मिळते. पेरूमध्ये दोन प्रकारच्या जाती असतात; एक पांढरा गर असणारा व दुसरा गुलाबी गर असणारा. पांढरे पेरू चवीला अधिक गोड असतात. पेरूमध्ये सर्वांत अधिक प्रमाणात “सी’ जीवनसत्त्व आहे.

गुणधर्म ः मनुष्याला वात झाला असता त्यावर पेरू गुणकारी आहे. पेरूमुळे बद्धकोष्ठताही नष्ट होते. पेरू स्वादिष्ट, तुरट, गोड, वीर्यवर्धक, ग्राही, थंड, पित्तशामक आणि रुचकर असतो. तो जंतुनाशक असून दाह, भ्रमिष्टपणा, मूर्छा नष्ट करणारा आणि तृषाशामक आहे.

घटक ः पाणी 76.1 टक्‍के, प्रोटिन 1.5 टक्‍के, चरबी 0.2 टक्‍के, कार्बोदित पदार्थ 14.5 टक्‍के, कॅल्शियम 0.01 टक्‍के, फॉस्फरस 0.04 टक्‍के, लोह 100 ग्रॅम, जीवनसत्त्व “सी’ 100 ग्रॅम. पेरूच्या सालीमध्ये आणि सालीजवळच्या गरामध्ये “सी’ जीवनसत्त्वाचे प्रमाण अधिक असते. हे फळ जितके जास्त पिकते, तसे त्यातील “सी’ जीवनसत्त्वाचे प्रमाण कमी होत जाते.

औषधी उपयोग ः पेरू खाण्यापेक्षा त्याचा रस सेवन केल्याने तो जास्त उपयुक्‍त ठरतो. पेरूच्या रसातून अधिक पोषक घटक मिळतात. 100 मि.लि. रसामधून 70 ते 170 मि. ग्रॅम “सी’ जीवनसत्त्व प्राप्त होते.

शरीराची सूज कमी करतो जांभूळ रस

उन्हाळ्याच्या शेवटी वर्षातूत जांभळाचे उत्पादन होते. जांभूळ चवीला मधुर थोडे आंबट व थोडे तुरट असते.

गुणधर्म ः जांभूळ दीपक, पित्तहारक, दाहनाशक, मूत्रगामी, आणि ग्राही असते.

घटक ः कार्बोदित पदार्थ 19.7 टक्‍के, कॅल्शियम 0.02 टक्‍के, फॉस्फरस 0.01 टक्‍के, लोह 100 ग्रॅम. पाणी 78.2 टक्‍के, प्रोटिन 0.7 टक्‍के, चरबी 0.1 टक्‍के, जांभळामध्ये थोड्या प्रमाणात जीवनसत्त्व “सी’ तसेच “बी’ गटातील जीवनसत्त्वे, फॉलिक ऍसिड व कॉलीनही असते.

औषधी उपयोग ः जांभळाचा रस काढताना ती एक ते दोन तास थंड पाण्यात भिजवून ठेवावीत, त्यानंतर त्यांतील बिया काढून त्यांचा रस काढावा. यकृताच्या विकारांत जांभळाचा रस लिव्हरची कार्यक्षमता वाढवतो. प्रमेह व मधुमेह या रोगांमध्ये जांभळाचा रस हे एक उत्तम औषध आहे. अपचन, जुलाब, मुरडा, संग्रहणी, मुतखडा, रक्‍तपित्त आणि रक्‍तदोष यासारख्या विकारांचे जांभळांच्या रस सेवनाने निवारण होते.

जांभूळ हे वातकारक असल्याने उपाशी पोटी खाऊ नयेत. जांभळे खाण्यापूर्वी व खाल्ल्यानंतर तीन तासांपर्यंत दूध घेऊ नये. प्लीहा व यकृताच्या विकारांत जांभूळ हे जालीम औषध आहे.

“लिव्हर एक्‍स्ट्रॅक्‍ट’ सारखी द्रव्ये इंजेक्‍शन मधून घेण्याऐवजी जांभळांचा रस सेवन केला तर तो अधिक उपयुक्‍त ठरतो. तो यकृताला कार्यक्षम बनवतो. ह्या रसामुळे पोटाच्या तक्रारी दूर होतात. हृदयासाठी तो हितकर आहे. पांडुरोगामध्ये हा रस लाभदायक आहे.

तसेच मूत्राशयात दाह होत असता जांभळाचा रस गुणकारी आहे. शरीरावर सूज आली असता किंवा उलट्या होत असतील तर आणि बाळंतिणीने किंवा उपवास करणाऱ्याने जांभळाचे किंवा जांभळांच्या रसाचे सेवन करू नये.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.