बीजिंग – अंतराळ संशोधन आणि समुद्रातील संशोधनामध्ये आघाडी मिळवल्यानंतर चीनच्या संशोधकांनी आता भूगर्भाकडे लक्ष केंद्रित केले असून जमिनीखाली 2400 मीटरवर एक अत्याधुनिक प्रयोगशाळा बांधण्यात आली आहे. आत्तापर्यंत बहुतेक शास्त्रज्ञांना अज्ञात असलेल्या डार्क मॅटरचा शोध घेण्याचे आणि इतर तत्सम प्रयोग या अत्याधुनिक प्रयोगशाळेत केले जात आहेत.
सिंगूहा युनिव्हर्सिटी आणि येलॉंग रिव्हर हायड्रोपॉवर डेव्हलपमेंट कंपनी या दोघांच्या संयुक्त विद्यमाने ही प्रयोगशाळा उभारण्याचे काम 2020 मध्ये सुरू झाले होते. चीनमधील प्रख्यात जिनपिंग माउंटनखाली खोदकाम सुरू करून ही प्रयोगशाळा उभारण्याचे काम सुरू झाले. आता ही प्रयोगशाळा प्रत्यक्षात आली असून तेथे डार्क मॅटर बाबत प्रयोगही सुरू करण्यात आले आहेत.
प्रयोगशाळा भूगर्भात खोलवर असल्याने तेथे कोणत्याही प्रकारचा डिस्टर्बन्स येत नाही. सहसा डार्क मॅटरचे संशोधन करत असताना पृथ्वीवरील जी किरणे अडथळा ठरतात त्या किरणांचाही येथे अडथळा येत नसल्याने याबाबतचे संशोधन पुढील टप्प्यावर जाण्याची आशा निर्माण झाली आहे.
अर्थात चीनने आत्तापर्यंत या प्रयोगशाळेची माहिती गुप्तच ठेवली असून तिथे नक्की अजून कोणते प्रयोग केले जाणार आहेत, याबाबत कोणतीही माहिती दिली जात नाही. जरी या प्रयोगामध्ये एक युनिव्हर्सिटी आणि एक खाजगी कंपनी सहभागी असली तरी या प्रयोगाला सरकारचा आशीर्वाद असल्याचेही बोलले जात आहे.