मुंबई – राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी विविध विषयांवर संवाद साधला. यावेळी सिल्व्हर ओक हल्ल्याप्रकरणी नागपूरवरून आलेल्या कॉल संदर्भात त्यांनी सांगितले की, पोलिसांना चौकशीमध्ये जी रीतसर माहिती मिळत आहे ती न्यायालयामध्ये सुपूर्द केली जात आहे. त्यामुळे सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असताना त्यासंदर्भातील चौकशीवर भाष्य करणे योग्य होणार नाही.
गृहमंत्री पुढे म्हणाले की, हे खरं आहे की, 4 तारखेला गुप्तचर विभागाकडून सिल्व्हर ओक हल्ल्यासंदर्भात कळवलं गेलं होतं. मात्र तरीसुद्धा सुरक्षा यंत्रणेमध्ये त्रुटी राहिल्या आणि हवा तसा बंदोबस्त ठेवला गेला नाही. यासंदर्भातील चौकशीचे आदेश दिले आहेत. संबंधित सहाय्यक पोलिस उपायुक्तांची बदली केली गेली आहे व गावदेवी पोलिस ठाण्यातील पोलिस इन्स्पेक्टरला निलंबित केले आहे. सविस्तर चौकशीमध्ये जी माहिती समोर येईल त्यानुसार कारवाई करू, असे त्यांनी यावेळी सांगितले.