राजगुरूनगर, (प्रतिनिधी) – रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सहकारी बँकांवर रोज लक्ष ठेवून आहे. त्यामुळे संचालक मंडळाला काटेकोरपणे काम करावे लागेल. सर्व नियम कायद्यांची अंमलबजावणी करावी लागेल. त्यासाठी कर्मचार्यांच्यासह संचालकांनीही प्रशिक्षित होणे आवश्यक आहे, असे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.
राजगुरूनगर सहकारी बँकेस वळसे पाटलांनी भेट दिली, त्यावेळी राजगुरूनगर सहकार बँकेच्या अध्यक्ष व संचालकांशी हितगुज करताना ते बोलत होते. यावेळी बँकेचे अध्यक्ष दिनेश ओसवाल, उपाध्यक्ष अविनाश कहाणे, संचालक किरण आहेर, राजेंद्र सांडभोर, विजया शिंदे, सागर पाटोळे, दत्ता भेगडे, गौतम कोतवाल, दीपक वारूळे, सुरेश कौदरे, सरव्यवस्थापक अमृत टाकळकर, सहायक सरव्यवस्थापक दिलीप मलघे, मंजित महिंद्रकर आदी उपस्थित होते.
वळसे पाटील म्हणाले की, केंद्र सरकार नवीन सहकार कायदा आणणार असून त्यानुसार राज्यालाही सहकार कायदा करावा लागणार आहे. सहकारी संस्थांचे कार्य सुसंगत करण्यासाठी, नवीन कार्यप्रणाली आणण्याचे केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या विचाराधीन आहे. सर्व सहकारी संस्था इंटरनेटद्वारे जोडण्याचा विचार सुरू आहे.
तसेच नवीन सहकार कायदा ते आणणार आहेत. त्यानुसार काही तरतुदी वगळून राज्यालाही नवीन सहकार कायदा करावा लागेल. याशिवाय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बँकांवर रोज लक्ष ठेवून आहे. त्यामुळे संचालक मंडळाला काटेकोरपणे काम करावे लागेल. सर्व नियम कायद्यांची अंमलबजावणी करावी लागेल. त्यासाठी संचालकांनीही प्रशिक्षित होणे आवश्यक आहे.
कर्जदाराची क्षमता पाहून…
राजगुरूनगर सहकारी बँक खूप जुनी असून पूर्वजांनी ती प्रयत्नपूर्वक वाढविली आहे. बँक पारदर्शक आणि सर्वसामान्यांना मदत होईल असा कारभार करत आहे. विस्ताराचे धोरणही आखत आहे. भविष्यातही अधिक मोठे काम संचालकांना करावे लागणार आहे. कर्ज प्रकरणे करताना भिडस्तपणा सोडून कागदपत्रे आणि कर्जदाराची क्षमता पाहून निर्णय घेतले पाहिजेत, असे वळसे पाटलांनी नमूद केले.
राजगुरूनगर सहकारी बँक नवनवीन योजना आणून अधिकाधिक लोकांपर्यंत बँक सेवा पोहोचविण्यासाठी कार्यरत आहे. सहकाराबाबतची वळसे पाटलांची विचारधारा आम्ही पाहत आलो आहोत. वेळोवेळी ते संस्थांना मार्गदर्शन करत असतात. आम्हीही त्यातून बोध घेत असतो. – दिनेश ओसवाल, अध्यक्ष, राजगुरूनगर सहकारी बँक
राजगुरूनगर सहकारी बँकेला सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भेट दिली त्यावेळी त्याचा सत्कार बँकेचे अध्यक्ष दिनेश ओसवाल यांनी केला. याप्रसंग़ी उपस्थित अन्य मान्यवर.