शिंदे वासुली- चाकण एमआयडीसी विभागातील निघोजे हद्दीतील महिंद्रा कंपनी समोरील मुख्यरस्त्याच्या दुतर्फा नव्याने पादचारी मार्ग बांधून रस्त्याच्या दोन्ही बाजूला विविध प्रकारचे सावलीचे व शोभेची झाडे लावली जात आहेत. एमआयडीसी प्रशासनाने रस्ता सुशोभीकरणाचे काम सुरू केल्याने कारखानदार, कामगार यांनी समाधान व्यक्त केले आहे. पिंपरी-चिंचवड औद्योगिक वसाहतीलगत सध्या विकसित होत असलेल्या चाकण एमआयडीसी भागातील निघोजे, महाळूंगे, खालुंब्रे, सावरदरी, भांबोली, वराळे, शिंदे वासुली मध्ये प्रशस्त व दर्जेदार रस्ते बांधण्याचे काम एमआयडीसीच्या चिंचवड विभागाने चांगल्या प्रकारे केले आहे.
नुकतेच एमआयडीसीने तलवडे आयटी पार्क इंद्रायणी नदीच्या पुलापासून निघोजेच्या हद्दीतील इंडुरन्स सर्कलपर्यंत सुमारे चार किलोमीटर मुख्य रस्त्याच्या कडेला दुतर्फा रंगित सिमेंट पेव्हिंग ब्लॉक बसवून नव्याने पादचारी मार्ग बांधला जात आहे. तसेच या नविन बांधलेल्या पादचारी मार्गालगत विविध जातीची रोपं लावून वृक्षसंवर्धन केले जाणार आहे. अशा प्रकारचे काम आठ किलोमीटर पादचारी मार्ग व वृक्षलागवड करुन रस्ता सुशोभीकरणाचे काम एमआयडीसी प्रशासनाच्या माध्यमातून आरएमजे कन्स्ट्रक्शन कंपनी करत आहे. त्यामुळे कंपनी कामगारांना पायी चालणे सोयीचे होणार आहे.