नगर – नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील सुपा एमआयडीसीतील एका कंपनीच्या प्रशिक्षणासाठी दहा जण चीनला गेले होते. त्यातील सात जण प्रशिक्षणानंतर परतले असून खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभागाने या सर्वांची तपासणी केली असून आरोग्य या सर्वांची प्रकृती उत्तम असल्याचे सांगितले. त्यामुळे सर्वांनी करोना या संभाव्य धोक्यापासून सुटकेचा निश्वास सोडला आहे.
सुपा एमआयडीसीतील एका कंपनीचे काही जण प्रशिक्षणासाठी चीनला गेले होते. त्यातील एकाची माहिती आरोग्य विभागाला मिळताच त्यांनी त्याची भेट घेऊन आरोग्याची तपासणी केली. त्यात त्याची प्रकृती ठीक असल्याचे स्पष्ट झाले असून या तरूणाबरोबर चीनला गेलेल्या इतर तरूणांची माहिती त्याच्याकडून घेवून आरोग्य विभागाने त्यांचीही तपासणी आज,दि.4 केली आहे. त्या सर्वांची प्रकृतीही उत्तम असल्याचा निर्वाळा आरोग्य विभागाने दिला आहे.
चीनमध्ये करोना विषाणूने थैमान घातलेले असून त्याची लागण जगातील बारापेक्षा अधिक देशांना लागलेली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्य आणीबाणी जाहीर केलेली आहे. भारतातही करोनामुळे दोनजणांचा मृत्यू झालेला आहे. भारतातही करोनामुळे दोनजणांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे चीनमधून भारतात येणाऱ्या प्रत्येकाची आरोग्य विभागाकडून पडताळणी केली जात आहे. त्यांच्यावर चौदा दिवस आरोग्य विभाग लक्ष ठेवून राहणार आहे.
बाबुर्डी बेंद येथील एक तरूण चीन येथे जाऊन आलेला आहे. त्याची आरोग्य विभागाने तपासणी केलेली असून तो ठणठणीत आहे. त्याला कुठलाही त्रास होत नसल्याचे तपासणी पथकाकडून अहवाल प्राप्त झालेला आहे. मागील महिनाभरात जिल्ह्यातील कोणी चीनवरून परतलेले असेल तर त्यांनी जिल्हा रुग्णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बापूसाहेब गाडे यांनी केले आहे.