पुणे – राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येत असल्याने शिक्षण विभागातील प्रशासकीय कामे मार्गी लावण्यासाठी कर्मचाऱ्यांची कार्यालयातील 100 टक्के उपस्थिती बंधनकारक केली आहे. करोनामुळे मार्चपासून लागु केलेल्या लॉकडाऊनमुळे शासकीय कार्यालयात गर्दी होऊ नये या दृष्टीने अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीचे प्रमाण निश्चित करून दिले होते.
एक दिवसाआड किंवा ठराविक दिवशी उपस्थित राहण्याबाबतचे प्रत्येक कार्यालयाचे स्वतंत्र वेळापत्रक लागू केले होते. करोनाचे प्रमाण कमी होत चालल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितींचे प्रमाण पुन्हा वाढवले आहे. आता अधिकाऱ्यांना 100 टक्के उपस्थित राहण्याबाबत काही दिवसांपूर्वीच सूचना दिल्या आहेत. मात्र, कर्मचाऱ्यांची उपस्थिती 30 टक्केच ठेवण्यात आली होती.
शिक्षण आयुक्त हे राज्यातील महत्त्वाचे कार्यालय असल्याने कामाची व्याप्ती लक्षात घेता व कार्यालयात येणाऱ्या नागरिकांचे व शिक्षण आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या कार्यालयांशी संबंधीत कामे पूर्ण करण्यासाठी 9 फेब्रुवारी 2021 पासून नियमित कर्मचाऱ्यांची उपस्थिती 100 टक्के केली आहे. सर्वांनी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून कामकाज पूर्ण करण्याबाबतचे आदेश शिक्षण आयुक्त कार्यालयातील सहसंचालक वैजनाथ खांडके यांनी काढले आहेत.
प्राथमिक शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक, अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद संचालक, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अध्यक्ष आदी कार्यालयांनाही अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत आदेश बजावले आहेत.