सातारा – लॉकडाऊन 4 मध्ये काही बाबतीत शिथिलता देणारे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी गुरूवारी जारी केले. त्यानुसार सर्व वैयक्तिक व सार्वजनिक वाहतुकीस परवानगी देण्यात आली असून यामध्ये दुचाकी वाहनावर 1 चालक, तीनचाकीवर 1+2 व्यक्ती, चार चाकी वाहनात 1+2 व्यक्ती अशी वाहतूक करता येईल.
सुरक्षित शारीरिक अंतर व सफाई व्यवस्थेची खबरदारी घेऊन विहित केलेल्या प्रवासी क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने जिल्ह्यांतर्गत एसटी बस सेवा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. इतर सर्व दुकाने, शॉप, औद्योगिक व खासगी आस्थापना सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. अत्यावश्यक व वैद्यकीय सेवा या कारणांशिवाय सायंकाळी 7 ते सकाळी 7 या कालावधीत सर्व व्यक्तींच्या हालचाली प्रतिबंधित करण्यात आल्या आहेत.
राज्यातील करोना संसर्गाबाबत शासनाच्या दि. 19 मे च्या आदेशामध्ये सातारा जिल्हा नॉन रेड झोनमध्ये समाविष्ट आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी गुरूवारी आदेश जारी केले आहेत. त्या आदेशानुसार काही बाबी प्रतिबंधीत करण्यात आल्या आहेत. तर काहींना परवानगी देण्यात आली आहे. त्याशिवाय कोरनाच्या अनुषंगाने काही प्रतिबंध कायम आहेत. त्यानुसार सार्वजनिक ठिकाणी, घराबाहेर व घरामध्ये जेथे लोकांचा वावर आहे, तेथे चेहऱ्याच्या तोंडावर व नाकावर मास्कचा वापर न करणाऱ्या व्यक्तींवर 500 रुपये दंड आकारण्यात येईल. कोणत्याही सार्वजनिक अथवा खासगी ठिकाणी थुंकल्यास 1000 रुपये दंड आकारण्यात येईल.
जिल्ह्यात सार्वजनिक लोकांचा वावर असणाऱ्या खासगी ठिकाणी तसेच वाहतुकीच्या साधनांमध्ये सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक आहे. दुकानामध्ये प्रत्येक ग्राहकात किमान 6 फूट अंतर राहील, याची खात्री करावी तसेच दुकानामध्ये पाचपेक्षा जास्त व्यक्तींना घेण्यास मनाई आहे. या आदेशाचे ग्रामीण भागात प्रथम उल्लंघन झाल्यास 500 रुपये व दुसऱ्यांदा उल्लंघन केल्यास 1000 रुपये दंड आकारण्यात येईल. ग्रामीण भागात तिसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास दुकानाचा परवाना तीन दिवसांसाठी निलंबित करुन दुकान तीन दिवसांसाठी बंद ठेवण्यात येईल. या आदेशाचे शहरी भागात प्रथम उल्लंघन झाल्यास 1000 रुपये, दुसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास 2000 रुपये दंड आकारण्यात येईल.
शहरी भागात तिसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास दुकानाचा परवाना तीन दिवसांसाठी निलंबित करुन दुकान तीन दिवसांसाठी बंद ठेवण्यात येईल. ग्रामीण व शहरी दोन्ही भागात या आदेशाची अंमलबजावणी स्थानिक स्वराज्य संस्थेने करावयाची आहे. शक्य असेल त्या ठिकाणी घरातून काम करण्यास प्राधान्य देण्यात यावे. कार्यालयामध्ये, कामाच्या ठिकाणी मार्केटमध्ये, औद्योगिक तसेच व्यावसायिक आस्थापनेमध्ये कामाच्या आणि व्यवसायाच्या वेळा गर्दी होणार नाही, अशा पध्दतीने विभागून द्याव्यात. थर्मल स्कॅनिग, हॅंडवॉश, सॅनिटायझर याची एन्ट्री पॉंईट व एक्झिट पॉंईंटवर व्यवस्था करावी. कामाच्या ठिकाणी, सार्वजनिक उपयोगाच्या जागा व सामान्य माणसाच्या वापरात येणाऱ्या सर्व जागा व वस्तू यांचे अधूनमधून सॅनिटायझेशन करण्यात यावे.
सर्व औद्योगिक व व्यावसायिक आस्थापना यांनी त्यांच्या कामगारांमध्ये कामाची वेळी, कामाची पाळी बदलण्याची वेळी, जेवणाच्या व इतर सुट्टीचे वेळी, कामावर येताना व कामावरुन सुटताना सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक राहील, असे या आदेशात म्हटले आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधिताविरुध्द यथास्थिती आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51, भारतीय साथरोग अधिनियम 1897 व भारतीय दंड संहिता कलम 188 नुसार दंडनीय, कायदेशीर कारवाई संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी करावी, असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आदेशात नमूद केले आहे. कंटेनमेंट झोन वगळून तसेच सातारा शहरतील पोवईनाका ते नगरपालिका रस्ता ते राजवाडा, पोवई नाका ते शाहू स्टेडियम रस्ता, स्टॅण्ड ते राधिका चौक, पोवई नाका ते पोलीस मुख्यालय मार्गे मोती चौक हे प्रतिबंधित रस्ते वगळून हे आदेश सर्व क्षेत्रांसाठी लागू राहतील.
या गोष्टी सुरू राहणार
इतर सर्व दुकाने, शॉप, औद्योगिक व खासगी आस्थापना सुरू ठेवण्यास परवानगी.
रेस्टॉरंटमधील स्वयंपाकघरामध्ये पदार्थ तयार करुन घरपोच सेवा देता येईल.
क्रीडांगण, स्टेडियम व सार्वजनिक खुल्या जागेमध्ये प्रेक्षकांच्या उपस्थितीशिवाय व समूह विरहीत, सामाजिक अंतर ठेवून शारिरिक व्यायाम व इतर क्रिया करण्यास परवानगी.
सर्व वैयक्तिक व सार्वजनिक वाहतुकीस परवानगी. यामध्ये दुचाकी वाहनावर 1 चालक, तीनचाकीवर 1+2 व्यक्ती, चार चाकी वाहनात 1+2 व्यक्ती अशी वाहतूक करता येईल.
सुरक्षित शारीरिक अंतर व सफाई व्यवस्थेची खबरदारी घेऊन विहित केलेल्या प्रवासी क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने जिल्ह्यांतर्गत एसटी बस सेवा सुरु करण्यास परवानगी.
सर्व मार्केट व दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेमध्ये सुरू राहतील. गर्दी अथवा सामाजिक अंतराचे पालन न केल्यास तात्काळ बंद करण्यात येतील.
अंत्यविधी व लग्न समारंभात 50 पर्यत व्यक्तींना सामाजिक अंतर ठेवून कार्यक्रम करण्यास परवानगी. तथापि, लोकांची गर्दी होऊ नये म्हणून संयोजकांनी काळजी घेणे गरजेचे.
या गोष्टी बंद राहणार
अत्यावश्यक व वैद्यकीय सेवा या कारणाशिवाय सायंकाळी 7 ते सकाळी 7 या कालावधीत सर्व व्यक्तींच्या हालचाली प्रतिबंधित.
वय वर्षे 65 वर्षावरील व्यक्ती, व्याधीयुक्त व्यक्ती, गर्भवती महिला, 10 वर्षाखालील मुले यांनी अत्यावश्यक सेवा व वैद्यकीय सेवा वगळता बाहेर पडण्यास प्रतिबंध.
सर्व शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, कोचिंग इन्स्टिट्यूूट बंद.
हॉटेल, रेस्टॉरंट, स्पा व इतर हॉस्पिटिलिटी सेवा बंद. (या सेवा फक्त आरोग्य, पोलिस, शासकीय अधिकारी व कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, लॉकडाऊनमुळे अडकलेले पर्यटक, कामगार व क्वारंटाइन सुविधा चालविणाऱ्या ठिकाणे यांच्यासाठी सुरू राहतील)
चित्रपटगृहे, शॉपिंग मॉल, जिम, स्विमींग पुल, एंटरटेंमेंट पार्क, ऑडिटोरियम, असेंम्बली हॉल,
मंगल कार्यालये बंद.
सर्व सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम, इतर
मेळावे व मोठया संख्येने लोक जमा होणारे कार्यक्रम बंद.
सर्व धार्मिक स्थळे व प्रार्थना स्थळे बंद.
सार्वजनिक ठिकाणी दारु, पान, तंबाखू इत्यादी सेवन करण्यास मनाई.