मारहाण करुन कारचालक फरार ः गाडीच्या क्रमांकावरून शोध सुरू
मंचर- कळंब (ता. आंबेगाव) येथे पुणे-जव्हार एसटी गाडीचे चालक दीपक खंडेराव शिंदे यांना एका कारचालकाने मारहाण केल्याची घटना शनिवारी (दि. 15) घडली. मारहाणीच्या घटनेनंतर कारचालक फरार झाला असून त्याच्या गाडीच्या क्रमांकावरून मंचर पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
जव्हार एसटी आगाराची बस (क्र. एमएच 20 बीएल 2266) ही पुणे येथून जव्हारकडे चालक दीपक शिंदे घेऊन जात होते. कळंब (ता. आंबेगाव) येथील घोडनदीच्या पुलावरून एसटी बसचालक दीपक शिंदे कार (क्र. एमएच 12 एक्स 825) ओव्हरटेक करून पुढे जात असताना या कारचालकाने एसटी बस पुढे आडवे येऊन एसटी चालकास त्याच्या केबिनमध्ये घुसून मारहाण केली.
एसटी चालकास केलेली मारहाण पाहून बसमधील प्रवासी संतप्त झाले. त्यांनी कारचालकास पकडण्याचा प्रयत्न केला असता कारचालकाने दगड उगारल्याने प्रवासी घाबरले. यावेळी एसटी बसचे वाहक रावसाहेब बाजीराव बचाव आणि मंचर एसटी वाहतूक नियंत्रक एम. एस. सय्यद यांनी मंचर पोलीस ठाण्यात धाव घेतली. चालक दीपक शिंदे यांनी कार चालकाने मारहाण केल्याची फिर्याद दिली आहे. त्यानुसार मंचर पोलीस कारचालकाचा शोध घेत आहेत.