नवी दिल्ली : शाहीन बाग येथील निदर्शनात सहभागी झालेल्या तीन वयोवृध्द महिला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची रविवारी (दि. 16) दुपारी दोन वाजता भेट घेणार आहेत. या महिला आता देशभर शाहीनबागच्या दादी म्हणून ओळखल्या जातात.
सुधारीत नागरिकत्व कायद्याच्या (का) बाबत काही आक्षेप असतील तर त्यांनी थेट माझ्याशी बोलावे, असे आवाहन अमित शहा यांनी संपूर्ण देशाला केले आहे. त्यामुळे आम्ही त्यांना भेटण्यासाठी दुपारी दोन वाजता जाणार आहोत. आमचे कोणतेही शिष्टमंडळ नसेल. ज्याला या कायद्याबाबत आक्षेप असेल त्याने जावे, असे शाहीनबागमधील निदर्शकांनी सांगितल्याचे वृत्त एएन आय या वृत्तसंस्थेने दिले आहे.
दरम्यान, या घडामोडींना स्थानिक राजकीय नेते आशू खान यांनी नॅशनल हेरॉल्डशी बोलताना दुजोरा दिला. ते म्हणाले, शाहीनबागच्या दादी अमित शहा यांना भेटण्यास उद्या दुपारी दोन वाजता जातील. त्याची योजना आम्ही आखत आहोत. मात्र अन्य एका संकेत स्थळाने स्थानिक नेते आसीफ खान यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात, असे काही ठरले नसल्याचे म्हटले आहे. या मुद्यावर शहांना भेटावे अशा मताचे काही जण आहेत. तर काही जण त्याचा उपयोग होणार नसल्याने निदर्शने सुरू ठेवावेत, अशा मताचे आहेत.
दरम्यान शाहीन बाग येथील आंदोलनस्थळावर आसिफ तुफानी यांनी जाहीर केले की, आम्ही अमित शहा यांना भेटण्यास तयार आहोत. आम्ही दादींना घेऊन त्यांना भेटायला जाऊ. त्यांच्या या घोषणेला काही महिलांनी आक्षेप घेतला. हा निर्णय कोणी एकटा घेऊ शकत नाही. आम्हाला अमित शहा यांना भेटण्यात स्वारस्य नाही. मात्र जर ज्येष्ठ नागरीकांनी तसा निर्णय घेतला तर आम्ही भेटायला जाऊ.
शाहीन बाग येथे या निर्णयाबाबत बैठक सुरू आहे. त्यातील काही जण भेटायला न जाण्याच्या मुद्द्यावर ठाम आहेत. तर काही जण जायचे असेल सारेच निदर्शक घेऊन जाऊ, अशा मताचे आहे. सायंकाळी पाचा वाजेपर्यंत याबाबत निश्चित तोडगा निघाला नव्हता.