पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल शुक्रवारी (दि.17) दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. 2021-22 या शैक्षणिक वर्षात 15 मार्च ते 4 एप्रिलदरम्यान दहावीची लेखी परीक्षा घेण्यात आली होती. याला 16 लाख 36 हजार 172 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यात 8 लाख 89 हजार 584 मुले, तर 7 लाख 49 हजार 478 मुलींचा समावेश होता. परीक्षेसाठी एकूण 22 हजार 911 माध्यमिक शाळांमधून नोंदणी झाली होती. या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यात 5 हजार 50 मुख्य केंद्र व 16 हजार 334 उपकेंद्र अशा एकूण 21 हजार 384 परीक्षा केंद्रे होती. दरवर्षीप्रमाणे यंदाही शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करून निकालाची तारीख जाहीर केली.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दि. १७ जून,२०२२ रोजी दु. १:०० वा.ऑनलाईन जाहीर होईल.#SSC #results@CMOMaharashtra pic.twitter.com/oO0lyRvF3b
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) June 16, 2022
परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण राज्य मंडळाने जाहीर केलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील व त्या माहितीची प्रिंट आऊटही विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. या www.mahresult.nic.in संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाची वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होणार आहे. https://ssc.mahresults.org.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होणार आहे.
ऑनलाइन निकालानंतर परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांना स्वत:च्या अनिवार्य विषयांपैकी कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून स्वत: किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठीच्या आवश्यक त्या अटी, शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणीसाठी 20 ते 29 जून, छायाप्रतीसाठी 20 जून ते 9 जुलैपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत.
कुठे पाहाल निकाल?
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावीचा निकाल लवकरच जाहीर होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर http :sscresult.mkcl.org च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे.
निकाल जाहीर झाल्यानंतर कसा चेक कराल?
स्टेप 1 : www.mahresult.nic.in वर लॉन ऑन करा
स्टेप 2 : दहावी निकालाच्या बॅनरवर क्लिक करा
स्टेप 3 : तिथं असलेल्या बॉक्समध्ये आपला सीट नंबर टाका
स्टेप 4 : तुमच्या आईच्या नावातील पहिली तीन अक्षरं लिहा
स्टेप 5 : एंटर केल्यानंतर तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल
स्टेप 6 : निकालाची प्रिंट आऊट घ्या किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करा