भाजपच्या प्रचाराचा नारळ फुटणार ;श्रीनिवास पाटील यांची दीपक पवारांबरोबर खलबते
सातारा – सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत राजकीय आखाडा तापायला सुरुवात झाली आहे. संपूर्ण जिल्ह्यात प्रचारासाठी फक्त 17 दिवस मिळणार असताना उदयनराजे भोसले व श्रीनिवास पाटील यांनी राजकीय डावपेच आखायला सुरुवात केली आहे. उदयनराजे यांच्या साताऱ्यातील पदयात्रांचा नारळ उद्या, दि. 3 रोजी फुटणार आहे तर राष्ट्रवादीचे नेते श्रीनिवास पाटील यांनी साताऱ्यात गाठीभेटींना सुरुवात केली आहे.
सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार दीपक पवार यांची श्रीनिवास पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. साहेबराव पवार यांचे आशीर्वाद घेतल्यानंतर श्रीनिवास पाटील यांनी दीपक पवार यांच्याबोबर पंधरा मिनिटे खलबते केली. श्रीनिवास पाटील यांनी 1999 पासून दहा वर्षे कराड लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. संपूर्ण जिल्ह्यात श्रीनिवास पाटील यांचा दांडगा जनसंपर्क आहे.
भाजपच्या शक्तिप्रदर्शनानंतर आता राष्ट्रवादीचेही गुरुवारी शक्तिप्रदर्शन होणार आहे. त्याच्या तयारीसाठी श्रीनिवास पाटील यांनी आज दुपारी आ. शशिकांत शिंदे यांची भेट घेऊन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी चर्चा केली. रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी सोहळ्यासाठी शरद पवार गुरुवारी रात्री साताऱ्यात येणार असून त्यावेळी दोन जिवलग मित्रांची राजकीय खलबते होणार, यात शंका नाही. उदयनराजे भोसले यांनीही अर्ज भरल्यानंतर प्रचाराचे मनावर घेतले आहे. मतदारसंघातील 17 लाख मतदारांपर्यंत इतक्या कमी कालावधीत पोहोचण्यासाठी कोपरा सभा, पदयात्रा, जाहीर सभांचे आयोजन करताना दोन्ही उमेदवारांना कसरत करावी लागेल.
तीन महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या केडरमुळे उदयनराजेंना सव्वालाखाचे मताधिक्य मिळाले होते. सातारा तालुक्यात उदयनराजे यांना फारशी काळजी नसली तरी अंर्तगत विरोधाचे पदर आहेत. कराड उत्तर, दक्षिण, पाटण व वाई या मतदारसंघांमधील नाराजीमुळे त्यांची खरी कसोटी असेल, तर साताऱ्यात श्रीनिवास यांना पाटीलकी दाखवावी लागेल.