पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात सर्वच राजकीय पक्षांनी आपापले उमेदवार अधिकृपणे जाहीर केले आहेत. त्यामुळे या मतदारसंघात चौरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा मतदारसंघ हा अनुसूचित जाती उमेदवारासाठी राखीव आहे.
या मतदारसंघात कॉंग्रेसने माजी गृहराज्यमंत्री आणि विद्यमान शहराध्यक्ष रमेश बागवे, भारतीय जनता पक्षाने आमदार दिलीप कांबळे यांचे बंधू आणि स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे, वंचित बहुजन आघाडीने माजी नगरसेवक लक्ष्मण आरडे आणि एमआयएमने माजी नगरसेविका हिना मोमीन यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे.
मात्र, उमेदवारी न मिळाल्यामुळे कॉंग्रेस आणि भाजपच्या काही ज्येष्ठ तसेच इच्छुक पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. यातील काही जण अपक्ष निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. या कार्यकर्त्यांचा सामना संबंधित उमेदवार आणि पक्षाचे पदाधिकारी कसा काय करणार, हे एक मोठे कोडे आहे.
कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात तीन
प्रमुख राजकीय पक्षांनी एकाच समाजातील नागरिकांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे इतर समाजाला राजकीय प्रतिनिधित्व मिळालेले नाही. याचाही काही प्रमाणात फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, उमेदवारांची नावे जाहीर केल्यामुळे येथील लढत कोणात होणार, हे स्पष्ट आहे. ही लढत अतिशय चुरशीची होणार आहे, असे चित्र दिसून येते. आता या चुरशीत नक्की कोण बाजी मारणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.