सिंगापूरच्या मादाम तुसॉं म्युझियममध्ये श्रीदेवीचा वॅक्स स्टॅच्यू उभारण्यात आला आहे. नुकतेच बोनी कपूर, जान्हवी आणि खुशी यांच्या उपस्थितीत या वॅक्स स्टॅच्यूचे अनावरण करण्यात आले. “मिस्टर इंडिया’मधील “हवा हवाई’च्या गेटअपमधील हा पुतळा प्रेक्षकांना श्रीदेवीच्या त्या यादगार गाण्याची आठवण करून देतो.
गोल्डन ड्रेस, डोक्यावर मुकुट आणि तशाच रंगाचे ऍक्सेसरीज परिधान केलेल्या या श्रीदेवीच्या गेटअपला नुकताच बोनी कपूर यांनी विशेष पसंत केले होते. श्रीदेवीच्या 56 व्या वाढदिवशी म्हणजे 13 ऑगस्टला हा पुतळा म्युझियममध्ये ठेवण्याबाबतची घोषणा मादाम तुसॉं म्युझियम्च्यावतीने करण्यात आली होती. या पुतळ्याचे अनावरण करताना जान्हवी आणि खुशी या दोघींना आपल्या भावना आवरणे कठिण झाले होते.
तामिळ, तेलगू, हिंदी, मल्याळम आणि कन्नड सिनेमांमधून रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणाऱ्या श्रीदेवीचा मृत्यू दोन वर्षांपूर्वी 24 फेब्रुवारीला दुबईमधील हॉटेलमध्ये झाला होता. त्यानंतऱ् “मॉम’ या श्रीदेवीच्या अखेरच्या सिनेमासाठी तिला सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार मरणोत्तर जाहीर झाला आहे. श्रीदेवीला सिंगापूरच्या मादाम तुसॉं म्युझियममध्ये वॅक्स स्टॅच्यूच्या स्वरुपात स्थान देऊन या म्युझियमने तिला मानवंदनाच दिली आहे.