मुंबई – कर्णधार हार्दिक पंड्याने नाबाद अर्धशतकी खेळी केल्यामुळे गुजरात टायटन्सने आयपीएल स्पर्धेत सोमवारी झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादसमोर विजयासाठी 163 धावा करण्याचे आव्हान ठेवले.
हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकत गुजरातला पहिल्यांदा फलंदाजी दिली. हैदराबादच्या गोलंदाजीसमोर गुजरातच्या फलंदाजांना अपयश येत होते. भरात असलेला शुभमन गिल तिसऱ्याच षटकांत बाद झाला. मात्र, त्यावेळी मॅथ्यू वेड चांगला खेळत होता. वेगाने धावा करण्याच्या प्रयत्नात तो 19 धावांवर परतला. पाठोपाठ यंदाच्या स्पर्धेत उपयुक्त खेळी करत असलेला साई सुंदरमही अपयशी ठरला.
कर्णधार पंड्याने मात्र एक बाजू सांभाळून ठेवत धावांचा वेगही वाढवण्यावर भर दिला. यंदाच्या स्पर्धेत आक्रमक फलंदाजी करत असलेला डेव्हीड मिलरनेही साफ निराशा केली. मात्र, त्यावेळी पंड्याला साथ देत अभिनव मनोहरने सुरेख फलंदाजी केली. त्याने पंड्याच्या साथीत पाचव्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी केली व संघाचे दीडशतक फलकावर लावले.
मनोहर स्थिरावलेला असताना अनावश्यक फटका मारून 35 धावांवर बाद झाला. या खेळीत त्याने 21 चेंडूंचा सामना करताना 5 चौकार व 1 षटकार फटकावला. दरम्यान, राहुल तेवतीयाने पंड्याचे अर्धशतक पूर्ण व्हावे यासाठी स्वतःची विकेट बहाल केली. नसलेली धाव घेण्याच्या प्रयत्नात तेवतीयामुळेच पंड्या अर्धशतक पूर्ण करण्यापूर्वीच बाद होता होता बचावला. त्यानंतर त्याने अखेरच्या षटकांत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने नाबाद 50 धावांची खेळी करताना 42 चेंडूत 4 चौकार व 1 षटकार फटकावला.
हैदराबादकडून टी. नटराजन व भुवनेश्वर कुमार यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. मार्को जेन्सन व उमरान मलिक यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
संक्षिप्त धावफलक – गुजरात टायटन्स – 20 षटकांत 7 बाद 162 धावा. (अभिनव मनोहर 35, मॅथ्यू वेड 19, हार्दिक पंड्या नाबाद 50, टी. नटराजन 2-34, भुवनेश्वर कुमार 2-37).