बॅंकॉक –भारताची ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिचे थायलंड सुपर सिरीज स्पर्धेतील आव्हान नेहमीप्रमाणे पहिल्याच फेरीत संपुष्टात आले आहे. सातत्याने फिजिओंची परवानगी, सुविधांच्या मागण्या करणारी सिंधू पुन्हा पहिल्याच फेरीत पराभूत झाली आहे.
करोनाच्या धोक्यानंतर या स्पर्धेद्वारे आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमध्ये पुनरागमन केलेल्या सामन्यात सिंधूसह बी. साईप्रणीत यांचे आव्हान पहिल्या फेरीतच संपुष्टात आले. सिंधूला डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्ड हिने 21-16, 24-26, 13-21 असे पराभूत केले.
पुरुष एकेरीत, साईप्रणीतला थायलंडच्या कॅंटाफोन वॅंगचारोएन याच्याकडून हार पत्करावी लागली. वॅंगचारोएनने साईप्रणीतला 21-16, 21-10 असे हरवले. गेल्या मोसमापासून सिंधूसह भारताच्या अनेक खेळाडूंनी सातत्याने सुविधांच्या मागण्या केल्या होत्या. तसेच करोनाचा धोका असतानाही तिने सरावादरम्यान प्रशिक्षक व फिजिओ यांनाही उपस्थित राहण्याची परवानगी मागितली होती.
केवळ मागण्या केल्यानंतर व त्याला आयोजकांनी सातत्याने सहकार्य केल्यानंतरही प्रत्यक्ष कोर्टवर येत असलेले अपयशही कायम राहिले आहे. सरस कामगिरीचा देखावा आता भारतीय बॅडमिंटनला चांगलाच महागात पडत असून आगामी टोकियो ऑलिम्पिकमध्ये याच सुमार कामगिरीचा फटका भारताला बसण्याची शक्यताही वाढली आहे.