Spurious Liquor Drinking : हरियाणातल्या यमुनानगरमध्ये विषारी दारु प्यायल्यामुळे सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्दैवी घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली असून एकाच दिवसामध्ये सहा जणांचा मृत्यू झाल्याने या प्रकरणाचा तपास पोलिस करीत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यमुनानगर जिल्ह्यातील मंडेबरी गावामध्ये ही घटना घडली आहे. मंडेबरीमध्ये सुरुवातीला एक-एक असा चार जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर बाजूच्या पंजेटो येथे दोघांचा मृत्यू झाला आणि पूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. पोलिस अधीक्षक यांच्यासह अनेक मोठे अधिकारी प्रकरणाची माहिती घेत आहेत.
गावकऱ्यांनी, मंडेबरी गावातील सहा लोक एकाच दिवशी विषारी दारु प्यायल्याने मृत्यूमुखी पडले. या लोकांना रुग्णालयातही दाखल करण्यात आलेले होते. तेव्हा डॉक्टरांनी मृत्यूचं कारण विषारी दारु असल्याचे सांगितले. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिस अॅक्शन मोडमध्ये आलेले आहेत.
पोलिस अधीक्षक गंगाराम पुनिया हे स्वतः गावामध्ये दाखल झाले होते. काही लोकांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेले आहे. परंतु अद्याप पोलिस कुठल्याही ठोस निर्णयापर्यंत पोहोचलेले नाहीत. गावातल्या काही लोकांनी सांगितले की, गावातूनच दारु घेण्यात आलेली होती. दारु पिल्यानंतर त्या लोकांना रक्ताच्या उलट्या सुरु झाल्या तर काहींना डोळ्यांनी दिसणं बंद झालं. तातडीने सर्वांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर ६ जणांचा मृत्यू झाला आहे.