पाच एकरावर प्रथमच राबवला प्रयोग
800 रुपये प्रति एकरप्रमाणे ड्रोन भाड्याने आणला
लाखणगाव – शेतीमध्ये सध्या आधुनिकता आली असून, पोंदेवाडी (ता. आंबेगाव) येथील एका शेतकऱ्याने त्यांच्या पाच एकर क्षेत्रातील मका पिकावर ड्रोनचा वापर करून औषध फवारणी केली आहे, यामुळे वेळेची आणि पैशांची मोठी बचत झाली असून, हा पहिलाच प्रयोग पाहण्यासाठी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमधे डिंभा उजवा कालवा आणि घोडनदीमुळे मोठ्या प्रमाणावर शेती बागायती झाली आहे. वर्षभर शेतीला पाणी उपलब्ध होत असल्याने शेतकरी शेतात विविध प्रकारची पिके घेतात. पोंदेवाडी येथील शेतकरी नाथा रामदास वाळुंज यांनीही पाच एकर क्षेत्रात स्वीट कॉर्नची लागवड केली आहे. मक्याच्या पिकाची पाच ते सहा फूट वाढ झाली आहे.
पिकाला अळीचा प्रादुर्भाव झाल्याने औषधाची फवारणी करणे गरजेचे होते; परंतु पाठीवरील पंपाने फवारणी करणे अवघड बनल्यामुळे पाच एकरसाठी संपूर्ण दिवस फवारणी करावी लागली असती, शिवाय त्रास वाढला असता. ड्रोनद्वारे फवारणी केल्यामुळे औषध कमी लागते त्यामुळे पैशाची व वेळेची बचत झाली आहे.असे खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळूंज यांनी सांगितले.++
अर्ध्या तासात पाच एकर फवारणी
नाथा वाळुंज यांनी 800 रुपये प्रती एकर याप्रमाणे ड्रोन भाड्याने आणून फवारणी केली संपूर्ण पाच एकरच्या फवारणीसाठी वाळूंज यांना अवघा अर्धा तास लागला. ड्रोनच्या टाकीत एकावेळी 10 लिटर औषध बसते 13 फुट रुंदीचे क्षेत्र एकावेळी फवारले जाते. ज्या ठिकाणी औषध संपले आहे त्याच ठिकाणावरून पुन्हा टाकीत औषध भरल्यानंतर ड्रोन पुन्हा फवारणीला सुरुवात करतो.