सिडनी – पुकोव्हस्की खेळपट्टीवर आल्यावर सावध फलंदाजी करत होता. जसप्रीत बुमराह व महंमद सिराज यांची गोलंदाजी देखील तो समर्थपणे खेळून काढत होता. त्यामुळे कर्णधार अजिंक्य रहाणेने चेंडू अश्विनकडे सोपवला. अश्विनच्या रॉंगवनवर पुकोव्हस्कीच्या बॅटची कड लागून चेंडू यष्टिरक्षक पंतकडे गेला. मात्र, हा झेल पंतला घेता आला नाही व पुकोव्हस्कीला जीवदान मिळाले.
त्यावेळी अश्विन पंतवर चांगलाच भडकला व त्याने त्याला काही ऐकवले. अर्थात या सामन्यात स्लीपमध्ये खुद्द रहाणे तसेच कव्हर्समध्ये अश्विननेही गचाळ क्षेत्ररक्षख केल्याने ऑस्ट्रेलियाला जोखीम पत्करण्याची गरजच भासली नाही.
मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियाची एकेरी व दुहेरी धावांची रसद तोडल्यावर ज्या पद्धतीने त्यांनी विकेट बहाल केल्या तीच संधी या सामन्यातही होती. मात्र, रहाणे तसेच गोलंदाजांनी लावलेले क्षेत्ररक्षण भुवया उंचावणारे ठरले. त्यांना एकेरी व दुहेरी धावांबरोबरच चौकारही सहज मिळत होते. इथेच त्यांच्या फलंदाजांवरचे दडपण दूर झाले व त्याचा फटका भारतीय संघाला बसला.