Vijay Hazare Trophy : महाराष्ट्राचा हिमाचल प्रदेशवर विजय

ऋतुराज गायकवाडचे आक्रमक शतक

जयपूर – कर्णधार व सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाडचे शतक व त्याला सुरेख साथ देत राजवर्धन हंगरगेकर, सत्यजित बच्छाव व मुकेश चौधरी यांच्या भेदक गोलंदजीच्या जोरावर महाराष्ट्राने विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत हिमाचल प्रदेशचा 59 धावांनी पराभव करत विजयी सलामी दिली.

सलामीवीर फलंदाज ऋतूराज गायकवाडने केलेल्या दमदार शतकाच्या जोरावर महराष्ट्राने प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 295 धावा केल्या. सय्यद मुश्‍ताक अली स्पर्धेतील अपयश धूवून काढण्यासाठी या स्पर्धेत महाराष्ट्राला सरस कामगिरी करण्याचे दडपण आहे. रविवारी कर्णधार ऋतुराजने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानेच यश नहारसह डावाची सुरुवात केली. या जोडीने 78 धावांची सलामी दिली. नहारने अर्धशतकी खेळी केली. तो बाद झाल्यावर नौशाद शेखने ऋतुराजला सुरेख साथ देत संघाच्या दीडशतकी धावा फलकावर लावल्या.

शेख स्थिरावला असे वाटत असतानाच 28 धावांवर बाद झाला. दरम्यान ऋतूराजने अर्धशतकी पल्ला पार करतानाच आक्रमक फलंदाजी करत शतकी मदलही मारली. मात्र, शतकानंतर तो लगेचच बाद झाला. त्याने 109 चेंडूत 9 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने 102 धावांची खेळी केली. त्यावेळी संघाचे द्विशतक फलकावर लागले होते. केदार जाधवने पुन्हा एकदा निराशा केली. त्यानंतर मात्र, अंकित बावणे 35 व अझीम काझी 47 यांनी संघाला त्रिशतकी धावांच्या जवळ नेले.

विजयासाठी मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना हिमाचलचे फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेले. त्यांच्या अभिमन्यु राणा, अमित कुमार, आयुष जामवाल, अंकुश बैन्स, पंकज जयस्वाल व कर्णधार रूषी धवन यांनी थोडीफार चमक दाखवली मात्र, त्यांना संघाचा पराभव टाळता आला नाही.
महाराष्ट्राकडून राजवर्धन हंगरगेकरने सर्वाधिक 4 गडी बाद केले. त्याला योग्य साथ देताना सत्यजित बच्छाव व मुकेश चौधरी यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक –

महाराष्ट्र – 50 षटकांत 8 बाद 295 धावा. (ऋतुराज गायकवाड 102, यश नहार 52, अझीम काझी 47, अंकित बावणे 35, नौशाद शेख 28, वैभव अरोरा 4-45, आयुष जामवाल 2-49, रुषी धवन 2-57). हिमाचल प्रदेश – 48.3 षटकांत सर्वबाद 236 धावा. (अभिमन्यु राणा 46, अमित कुमार 34, आयुष जामवाल 29, अंकूश बैन्स 28, पंकज जयस्वाल 23, रूषी धवन 22, राजवर्धन हंगरगेकर 4-42, सत्यजित बच्छाव 2-46, मुकेश चौधरी 2-50).

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.