नवी दिल्ली – स्टुअर्ट ब्रॉडच्या एकाच षटकात सलग सहा चेंडूंवर सहा षटकार मारल्यानंतर अनेकांना माझ्या बॅटमध्ये काहीतरी अक्षेपार्ह असल्याची शंका होती. सहावा षटकार फटकावल्यानंतर मैदानावरील पंचांनी माझ्या बॅटची तपासणीही केली होती, असा खुलासा सिक्सरकिंग युवराजसिंगने केला आहे. 2007 साली झालेल्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेतील या विक्रमी खेळीनंतर आज 13 वर्षांनी युवराजने याबाबत प्रथमच ही माहिती दिली.
या स्पर्धेत इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडच्या ऍण्ड्रयुु फ्लिंटॉफशी वाद झाल्यानंतर चिडलेल्या युवराजने हा सगळा राग वेगवान गोलंदाज ब्रॉडवर काढताना त्याच्या एकाच षटकांत सलग सहा षटकार फटकावले व विक्रम साकार केला. सहावा षटकार फटकावल्यानंतर मैदानावरील पंच माझ्याकडे आले व त्यांनी माझ्या बॅटची पाहणी केली, असा खुलासा युवराजने केला आहे.
खूप वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या ऍडम गिलख्रिस्टने एका सामन्यात 30 चेंडूत 70 धावांची आक्रमक खेळी केली होती, तेव्हा आणि इतकेच नाही तर 2003 साली झालेल्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉण्टिंगने भारताविरुद्ध दमदार दीडशतकी खेळी केली होती, त्यावेळीही त्याच्या बॅटमध्ये काहीतरी बसविण्यात आले आहे का अशी शंका उपस्थित केली गेली होती.
ब्रॉडला षटकार मारले त्यानंतर जेव्हा सामना संपला तेव्हा ड्रेसिंग रुमकडे परतत असताना इंग्लंडचे प्रशिक्षक माझ्याकडे आले व बॅटमध्ये कोणते खास लाकूड वापरले गेले आहे का, पंचांनी बॅटची तपासणी केली का, असे प्रश्न विचारले होते. त्यावर माझी बॅट तपासून घ्या माझी हरकत नाही, असे उत्तर दिले होते, असे युवराजने सांगितले.
विक्रमी बॅट जतन केल्या
2007 सालच्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत विक्रमी षटकार मारलेली बॅट आणि 2011 सालच्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडकात ज्या बॅटने माझ्या संपूर्ण स्पर्धेत मोलाच्या खेळी झाल्या ती बॅट, अशा या दोन्ही बॅट मी खूप जतन केल्या आहेत. त्यांचे मोल केवळ मलाच माहीत आहे, असे युवराजने व्यक्त केले.